Girish Mahajan on Kumbh Mela contractors : "कुंभमेळ्याच्या कामांत गुजराती ठेकेदारांना प्राधान्य दिल्याच्या आरोपांनंतर मी स्वतः सविस्तर माहिती घेतली. देशभरातून पारदर्शक पद्धतीने टेंडर मागवले गेले होते, ज्यामध्ये अत्यंत मोठी स्पर्धा होती. यात गुजरातचा केवळ एकच ठेकेदार असून त्यालाही अत्यंत छोटे काम मिळाले आहे," असे स्पष्ट करत कुंभमेळ्याची अनावश्यक बदनामी करू नका, अशा शब्दांमध्ये आज (दि.९) मंत्री गिरीश महाजन यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत साधू-महंतांकडून व्यक्त होणाऱ्या नाराजीवर बोलताना महाजन यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, "हा अधिकारी असा, तो तहसीलदार असा किंवा हा मंत्री असा, यावर चर्चा करत बसण्यापेक्षा साधू-महंतांनी फक्त कुंभमेळा व्यवस्थित पार पाडण्याचे आपले काम करावे. साधू-महंतांच्या मागणीनुसार सरकारने प्रत्येक आखाड्याला ५-५ कोटी रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू-महंतांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, शासन कुठलीही कसूर ठेवणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या कुंभमेळ्याला एक वर्ष बाकी असून सर्व कामे वेगाने सुरू आहेत आणि ती वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) जयंत पाटील यांच्या एकाच विमानातून झालेल्या प्रवासाबाबत बोलताना त्यांनी राजकीय चर्चा फेटाळून लावल्या. "विमानात कोणीही एकत्र प्रवास करू शकतो. यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनीही एकत्र प्रवास केला होता. त्यामुळे जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रवासात कोणतेही राजकारण नाही," असे महाजन यांनी स्पष्ट केले.
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, "या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष समितीची नियुक्ती केली आहे. स्थानिक नागरिकांची नेमकी मागणी काय आहे, याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत असून वेळेत समितीचा अहवाल प्राप्त करून योग्य तो निर्णय घेतला जाईल."