Mission Green Monsoon 
नाशिक

Girish Mahajan | स्पीकरवर बोलून रेकॉर्डिंग ऐकवणे योग्य नाही!

Girish Mahajan | थेट मुख्यमंत्र्यांशी फोनवरील चर्चा स्पीकरवर ऐकवणे अयोग्य; जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी टोचले आमदार सरोज अहिरे यांचे कान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आपण जनतेचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला या गोष्टीची समज असणे अत्यंत आवश्यक आहे. थेट मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलताना तो स्पीकरवर टाकून, त्याचे रेकॉर्डिंग लोकांना ऐकवणे किंवा त्याचे फोटो काढणे ही पद्धत अजिबात योग्य नाही, अशा शब्दांत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांचे जाहीर कान टोचले आहेत.

नाशिकमधील लोडशेडिंगच्या समस्येवरून आ. सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचे रेकॉर्डिंग सोशल मीडियामध्ये व्हायरल करत ते ऐकवले जात आहे.

मात्र, मंत्री महाजन यांनी आ. अहिरे यांच्या आंदोलन करण्याच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, तुमचा काय प्रश्न किंवा विषय आहे, तो तुम्ही अधिकृतपणे मांडला पाहिजे, त्यासाठी निवेदन दिले पाहिजे.

थेट मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलावे, पण ते स्पीकरवर टाकून लोकांना ऐकवणे योग्य नाही. या गोष्टीची समज एका लोकप्रतिनिधीला असायला हवी. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर अशा प्रकारे केवळ प्रसिद्धीसाठी फोटो काढणे किंवा ऑडिओ ऐकवणे यापेक्षा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असा सूचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

"शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून याची दखल घेतली. आठ दिवसांपासून प्रशासनास भेटत आहे. मात्र, समाधान झाले नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी लागली. त्याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्ध पिंपरी गावातील शेतकरीवर्गाने आंदोलनाचा इशारा दिला होता."
- आ. सरोज अहिरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT