नाशिक: गिफ्ट सिटीने गेल्या तीन वर्षात लक्षणीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. त्यामध्ये विदेशी भारतीय उद्योजक आणि नागरिकांकडून फंड आणि बँकिंग योजनांमध्ये ७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. गिफ्ट सिटीत सुमारे १०२ दशलक्ष डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक मिळाली आहे. येत्या २०३० पर्यत ही गुंतवणूक दुप्पट करण्याची योजना केंद्र सरकारने आखलेली आहे.
गिफ्ट सिटीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात (आयएफएससी) कार्यरत असलेल्या अर्थ भारत इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाकडून (आयएफएससीए) थर्ड पार्टी फंड व्यवस्थापनासाठी परवाना प्राप्त झाला आहे. त्यामुळे विदेशातील गुंतवणूक भारताकडे विविध फंडाच्या रुपाने आकर्षित होणार आहे.
आयएफएससीएमध्ये परवानाधारक निधी व्यवस्थापन संस्थांमध्ये अर्थ भारत या फर्मचा समावेश आहे. थर्ड पार्टी म्हणून कार्यरत असलेल्या निधी व्यवस्थापकांना दर्जेदार वित्तीय व्यासपीठ प्रदान करण्याचा अधिकार अर्थ भारतला या परवान्यामुळे मिळाला आहे.
अर्थ भारतने विकसित केलेल्या वित्तीय मंचाचा वापर करत फंड व्यवस्थापकांना भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदारांसाठी नियमांच्या चौकटीत विशेष गुंतवणूक योजना सुरू करत निधी उभारता येणार आहे. अर्थ भारत सध्या ७,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक मालमत्तेचे (एयूएम) व्यवस्थापन सांभाळत आहे. अर्थ भारतकडून सध्या गिफ्ट सिटीत अर्थ ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंड, अर्थ ग्लोबल मल्टीप्लायर फंड आणि अर्थ भारत अॅब्सोल्युट रिटर्न फंड हे तीन फंड व्यवस्थापित केले जात आहेत.
डीएसपीतर्फे चार नवीन योजना
डीएसपी म्युच्युअल फंडाने चार नवीन पॅसिव्ह फंड योजना आणल्या आहेत. डीएसपी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड, डीएसपी निफ्टी मिडकॅप १५० ईटीएफ फंड, डीएसपी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफ फंड अशा या चार योजना आहेत.
मिड-आणि स्मॉल-कॅप गटातील कंपन्यांच्या रुपाने भारतातील उद्योगविश्वाचे व्यापक स्वरुपात चित्र उलगडते, तसेच गतिमान कॉर्पोरेट विश्वाचे ते एकत्रित प्रतिनिधित्वही करतात. त्यामुळे या फंडांच्या रुपाने मिड-आणि स्मॉल-कॅप गटातील कंपन्यांमध्ये नियमांवर आधारित निर्देशांकाच्या माध्यमातून अल्प खर्चात गुंतवणूकीची संधी गुंतवणूकदारांना प्राप्त झालेली आहे.
निफ्टी ५०० निर्देशांकातील १०१ ते २५० या क्रमांकादरम्यान असलेल्या कंपन्यांचा निफ्टी मिडकॅप १५० निर्देशांकात समावेश आहे, तर निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांकात निफ्टी ५०० मधील २५१ ते ५०० क्रमांकादरम्यानच्या कंपन्यांचा समावेश आहे. या दोन्ही निर्देशांकांनी दीर्घकालात उत्तम परतावा प्रदान केलेला आहे.
गत दहा वर्षांच्या कालावधीत निफ्टी मिडकॅप १५० निर्देशांकाने सरासरी १६.२ टक्के दराने सरासरी वार्षिक (रोलिंग) परतावा दिला आहे आणि तो निफ्टी ५०० च्या १२.६ टक्क्यांच्या परताव्यापेक्षा खूपच जास्त आहे. तर स्मॉल-कॅप निर्देशांकाने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. निफ्टी ५०० च्या १२.६ टक्क्यांच्या तुलनेत निफ्टी स्मॉलकॅप २५० ने दहा वर्षात सरासरी १३.५ टक्क्यांनी रोलिंग परतावा दिलेला आहे. नवीन फंड ऑफर (एनएफओ) २४ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीदरम्यान खुली राहणार आहे.