नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश (मायको) कंपनीसमोर गुरुवारी (दि. ६) रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघातात प्रशांत गांगुर्डे (२९, रा. आयटीआय कॉलनी, श्रमिकनगर) या घंटागाडी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
प्रशांत गांगुर्डे हे सातपूरहून घराकडे जात असताना बॉश कंपनीसमोर आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रशांत गांगुर्डे हे कुटुंबातील एकुलते कर्ते पुत्र होते. त्यांच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे.
दरम्यान, महिंद्रा सर्कल परिसर अपघातप्रवण ठिकाण झाले आहे. सर्कलवरील सिग्नल कार्यरत असूनही त्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करतात. तसेच येथील दुकानांमुळे सदैव गर्दी असते. महिन्यात दोन-तीन अपघातांच्या घटना नियमित घडत असून अनेकजण जखमी, तर काहींचा मृत्यू याठिकाणी झाला आहे. येथील वाहतूक व्यवस्थेवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
कंटेनरचा प्रश्न सुटणार कधी?
रस्त्याच्या कडेला आणि मिळेल त्याठिकाणी कंटेनरचालक वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि अपघातांना निमंत्रण मिळते. या कंटेनर पार्किंगच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, 'कंटेनरचा प्रश्न मार्गी लागणार कधी?' असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.