Get on the field, 'fix' the ticket Chandrashekhar Bawankule
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जो नेत्यांच्या मागे मागे फिरेल त्याला तिकीट मिळणार नाही. तिकीट देणे नेत्यांच्या हाती नसून, राज्य संसदीय मंडळाच्या हाती आहे. ५१ टक्के मते घेणाऱ्यालाच तिकीट मिळेल. त्यामुळे आतापासूनच मैदानात उत्तरा, मतदारांना केंद्र आणि राज्याच्या योजना सांगा. 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रतिशोध लोकांना सांगा आणि आपले तिकीट 'फिक्स' करा, असे थेट आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
खुटवडनगर येथील सिद्धी बैंक्वेट हॉल येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत बावनकुळे बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मोदी सरकारला केंद्रात ११ वर्षे पूर्ण झाली असून, या काळात सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याची गरज आहे.
व्यासपीठावर भाजप केंद्रीय राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषद सभापती राम शिदे, विपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे, भारती नाईक आदी उपस्थित होते. माधुरी पाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. दोन महिने मंत्रालय बंद करा.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार असून, त्याच्या तयारीसाठी प्रत्येक मंत्र्याने राज्यभर दौर करण्याची गरज आहे. त्यामुळे पुढील दोन महिने मंत्रालय बंद करा, मंत्र्यांना जनतेत जाऊ द्या, असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संघटन मजबूत करण्यासाठी पुढील १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करून घेण्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील चारही महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करू, असा निर्धार राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. नाशिक महापालिकेत शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्यही त्यांनी यावेळी मांडले. सरकारच्या योजनांचा प्रचार जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज असून, त्यासाठी अंतर्गत गटबाजी थांबवून सर्वांनी एकत्रितपणे कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान, सूत्रसंचालकांनी मंत्री महाजन यांचा संभाव्य पालकमंत्री म्हणून उल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या.
आगामी निवडणुकांत लढवय्या कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी. त्यासाठी आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे मागणी करणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. कोणत्या कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली, याचा विचार तिकीट वाटपावेळी केला जाणार आहे. जिथे पक्षाचे मताधिक्य आहे, तिथे लढवय्या कार्यकत्यांचा नक्कीच विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. गुरुवारी (दि.५) नाशिक येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेप्रसंगी त्यांनी माध्यमांशी बोलताना, भाजपचे दरवाजे सर्वांसाठीच खुले असल्याचे सांगत बडगुजर यांच्या प्रवेशावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले. तसेच आमदार सीमा हिरे यांच्या विरोधाचा सूर मावळविण्याची जबाबदारीही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, नंतर उबाठा पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जाहीर केले.
दुसरीकडे, बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरून स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेत, बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला उघड विरोध केला होता. याबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना विचारले असता, त्यांनी भाजपचे दरवाजे सर्वांसाठीच उघडे असल्याचे स्पष्ट केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार हिरे आणि बडगुजर यांच्यात थेट सामना झाला होता. त्यामुळे गैरसमज दूर होण्यास काही काळ लागेल. त्यासाठी मंत्री महाजन आणि मी स्वतः लक्ष घालत आहे. शेवटी पक्ष वाढविणे महत्त्वाचे आहे. तसेच पक्षप्रवेशाचे अजून काही ठरले नाही यावर अद्याप चर्चा होणे बाकी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सलीम कुत्ता प्रकरणात देशद्रोहासह गंभीर आरोप असलेल्या बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, प्रत्येकावर आरोप होतात, काहींवर गुन्हे दाखल होतात, अटकही होत असते, पण जोपर्यंत न्यायालय दोष सिद्ध करत नाही, तोपर्यंत कोण्णी गुन्हेगार ठरत नाही. कोणत्याही व्यक्तीचे मूल्यमापन आपण न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर करावे.
ऑक्टोबरमध्ये निवडणुका घ्यायच्या असतील, तर महिना अगोदर निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार चार महिन्यांच्या कालावधीत निवडणुका घ्यायचे ठरल्यास, ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, अशात आचारसंहिता १५ ऑगस्टपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्थात अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आगामी निवडणुकीत भाजप महायुतीला कोणतेही आव्हान नाही. दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे की नाही, याचा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यांच्या एकत्र येण्यात आम्हाला काही रस नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढणार आहोत. ज्या ठिकाणी तिढा निर्माण होईल, तिथे मैत्रीपूर्ण लढत लढली जाईल. आम्हाला ५१ टक्क्यांची लढाई लढायची आहे. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत. आम्ही कोणाच्या आरोपांकडे बघत नाही, असे बावनकुळे म्हणाले.