नाशिक : चार दिवसांपासून शहर परिसरात संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने रामकुंड परिसर पाण्याखाली गेला आहे.  (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik Gangapur Dam | गंगापूर, दारणा धरणांमधून विसर्ग सुरु

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. या संततधारेमुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा गंगापूर धरणाची दारे उघडण्यात आली असून, धरणातून 7,413 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. तसेच दारणा, कडवा, भावलीसह विविध धरणांमधूनही विसर्ग केला जात आहे.

दहा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार सरी बरसत आहेत. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये उपयुक्त जलसाठा ४७ हजार ५३१ दलघफूवर (७३ टक्के) पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांवरील जलसंकट दूर सरले आहे. नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर ९३ टक्के भरले असून, धरणातील जलसाठा ५,२३८ दलघफूवर पोहोचला आहे. धरणातून सकाळी १० ला १,०५९ क्यूसेक वेगाने गोदावरीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करताना सायंकाळी ६ वाजता हा विसर्ग 7,413 क्यूसेकवर नेण्यात आला. तर आळंदीतून 80 तसेच गाैतमी-गोदावरीमधून 768 क्यूसेक विसर्ग केला जातोय. त्यामुळे गोदावरीला पूर आला असून, नदीकाठच्या रहिवाशांना सुरळीत स्थळी जाण्याच्या सूचना महापालिकेकडून करण्यात आल्या आहेत.

इगतपुरीत पावसाचा जोर कायम असून, तालुक्यात धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. दारणातून 4,428 क्यूसेक वेगाने विसर्ग केला जात आहे. तसेच भावलीतून 588, भाम 1,440, वालदेवी 107, कडव्यामधून 826 तर भोजापूरमधून 1,524 क्यूसक विसर्ग केला जाताेय. नांदूरमध्यमेश्वरच्या वरील भागातील धरणांमधून पाण्याची आवक वेगाने सुरू असल्याने बंधाऱ्यातून 9,465 क्यूसेक वेगाने जायकवाडीकडे पाणी झेपावते आहे. या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाऊ शकते. पावसाचा जोर कायम असल्याने विविध धरणांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दिंडोरीत सतर्कतेचे आवाहन

दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरण १०० टक्के भरले असून, पालखेडमध्ये माेठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. तसेच तालुक्यातील संततधारेमुळे नद्या-नाले दुथडी वाहत आहेत. त्यामुळे जनतेने सतर्क राहावे, असे आवाहन पालखेड पाटबंधारे उपविभागाकडून करण्यात आले आहे.

धरणांचा विसर्ग (क्यूसेक)

  • गंगापूर 7,413

  • दारणा 4,428

  • भावली 588

  • भाम 1,440

  • वालदेवी 107

  • कडवा 1,255

  • आळंदी 80

  • नांदूरमध्यमेश्वर 9,465

  • भोजापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT