Ganeshotsav decoration material and idol prices rise 
नाशिक

Ganeshotsav decoration material and idol prices rise : गणेशोत्सवात सजावट साहित्य, मूर्ती दरातही वाढ

फोल्डिंग घरगुती मखर, एलईडी रोषणाई; तरुणाईकडून सोशल मीडियातील संकल्पनेला वाव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : किराणा, भाजीपाला आदी वस्तूंनी ग्राहकांच्या नाकीनऊ आले आहेत. त्यात आता सणसमारंभालाही महागाईने उच्चांक गाठला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजेच्या साहित्यातही दरवाढ झाली आहे. उत्सवासाठी भाविकांना सुमारे १५ ते २० टक्के दरवाढीची झळ सोसावी लागत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

रविवार कारंजा परिसरातील कानडे मारुती लेन येथे सजावटीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. कागदी व फोल्डिंग घरगुती मखर, कापडी बॅकड्रॉप, कृत्रिम प्लास्टिकची फुले, तोरणे, एलईडी लाइट्स तसेच मखरांचे साहित्य लक्ष वेधून घेत आहे. कृत्रिम फुलांच्या माळी आणि फोल्डिंग मखरचा उपयोग करून सहजसोपी सजावट करता येत असल्याने ग्राहक तयार मखराऐवजी कापड, फुले आणि लाइट्स स्वतंत्रपणे घेऊन उपलब्ध जागेनुसार सजावट करण्याचे नियोजन करत आहेत.तरुणाईकडून सोशल मीडियावरील सजावटीच्या कल्पनांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातून अनेकजण घरातील सजावटीचे नियोजन करत आहेत.

दुकानांमध्ये सजावटीसाठी मंदिराची प्रतिकृती, फुलांची कमान, पारंपरिक दृश्याचे आयते सेटअप आणि आकर्षक सजावट करण्यात येत असल्याने ग्राहक ते पाहून दुकानात येत आहेत. त्यामुळे विविध आकार आणि डिझाइनच्या सजावटीला मागणी वाढली आहे. त्यातही सार्वजनिक गणेश मंडळाच्या सजावटीचे बजेटही वाढले आहे. विद्युत रोषणाईचे साहित्य, जनरेटरचे भाडे आणि मंडप सजावटीच्या खर्चात वाढ झाल्याने मंडळांकडून कापडी मंडप, एलईडी प्रकाशयोजना आणि विषयाधारित सजावटीला प्राधान्य दिले जात आहे.

मखराचे दर

घरगुती गणपतीसाठी कागदी व फोल्डिंग मखर ५०० ते तीन हजार रुपये, तर लाकडी मखर ३,५०० ते ७,५०० रुपये, कापडी बॅकड्रॉप ३०० ते ८०० रुपये, कृत्रिम प्लास्टिक फुलांची तोरणे व माळा ४० ते १५० रुपये पर्यंत आहेत. यंदा भाव वाढले असल्याने १,८०० रुपयांचे फोल्डिंग कागदी मखर आणि ४५० रुपयांचा कापडी बॅकड्रॉप घेतला आहे. बाकी घरगुती सजावट घरीच करणार आहे -

- सुप्रिया कुलकर्णी, ग्राहक

विद्युत रोषणाई, जनरेटर आणि मंडप डेकोरेशनचाही खर्च वाढल्याने यंदा सजावट बजेट लाखावरून दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत गेले आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी कापडी मंडप आणि एलईडी प्रकाशयोजनेवर जास्त भर दिला जात आहे.

- अमित फाळके, गणेश मंडळाचे सदस्य

महागाईचा फटका गणेशोत्सवावर बसला आहे. सजावटीचा कागद, रंग आणि मजुरीचे दर वाढल्याने तयार मखरांचे भाव यंदा १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. ८०० रुपयांच्या फोल्डिंग मखरांपासून ६,५०० रुपयांच्या डिझायनर लाकडी मंदिराचे भाव आहेत. गणेशमूर्तीचे देखील भाव वाढले असून, छोटी मूर्ती ५०० रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.

- सोहम करपे, मूर्ती व सजावट साहित्य विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT