आनंदाचा शिधा
आनंदाचा शिधा file photo
नाशिक

Ganeshostav 2024 | गणेशोत्सवात 'आनंदाचा शिधा' होणार द्विगुणित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यात दि. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. लाडक्या बाप्पाच्या भक्तांना शासनाने १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानांमधून १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत शिधा वितरीत केला जाईल. त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील साधारणत: आठ लाख रेशनकार्डधारक कुटुंबांना मिळणार आहे.

भक्तांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी शासनाने गतवर्षीच्या धर्तीवर यंदाही आनंदाचा शिधा संच देण्याचा निर्णय घेतला आहे. 100 रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणाडाळ व सोयाबीन तेल अशा चार वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने यंदाच्या वर्षी आधीपासूनच शिधासाठी तयारी सुरू केली आहे.

लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांनी तयारी सुरू केली आहे. भक्तांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी शासनाने गतवर्षीच्या धर्तीवर यंदाही आनंदाचा शिधा संच देण्याचा निर्णय घेतला आहे. एपीएल व प्राधान्य रेशनकार्डधारक कुटुंबांना हे संच वितरीत केले जाणार आहेत. 100 रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणाडाळ व सोयाबीन तेल अशा चार वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने २०२३ मध्ये गुढीपाडव्याला सर्वप्रथम 100 रुपयांत आनंदाचा शिधा वितरीत केला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती, गणेशोत्सव, श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधा संचाचे वितरण करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी वितरणासाठी लागलेला विलंब लक्षात घेता, शासनाने यंदाच्या वर्षी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे.

राज्यातील रेशन दुकानांमधून १५ ऑगस्टपासून लाभार्थींना शिधा संचांचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. महिनाभरात शेवटच्या लाभार्थीपर्यंत संच पाेहोचता करण्याचे नियोजन शासनाने केले आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील साधरणत: एक लाख ७५ हजार एपीएल तसेच सव्वासहा लाख प्राधान्य रेशनकार्डधारक कुटुंबांचा उत्सवाचा गोडवा वाढणार आहे.

यंदा सोयाबीन तेल

शासनाने गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या आनंदाच्या शिधा संचात १ लिटर पामतेल देण्यात येत होते. मात्र, पामतेलाच्या वापरावरून शासनाला सर्वच स्तरातून टिकेचे धनी व्हावे लागले होते. त्यामुळे गत अनुभव लक्षात घेता शासनाने यंदापासून पामतेलऐवजी सोयाबीन तेल देण्याचा निर्णय घेतला आहे.

SCROLL FOR NEXT