नाशिक : 'गणपती बाप्पा मोरया', 'मंगलमूर्ती मोरया', 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी आर्जव करत भाविकांनी रविवारी (दि. ८) दीड दिवसाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी अवघा गोदाघाट भक्तिमय वातावरणात दंग झाला होता.
लाडक्या गणरायाचे शनिवारी (दि. ७) वाजतगाजत स्वागत करण्यात आले. घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये विधिवत बाप्पाची प्रतिष्ठापना केली गेली. भक्ताच्या घरी पाहुणचार स्वीकारल्यानंतर दीड दिवसाच्या गणरायाने निरोप घेतला. यावेळी भक्तांच्या एका डोळ्यात आसू, तर दुसऱ्या डोळ्यात पुढील वर्षी पुन्हा लवकर यावे, असे साकडे घालत श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कायम असल्याने गोदाघाटावर पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रामकुंड परिसर, एकमुखी दत्तमंदिर पटांगण, गाडगे महाराज पूल येथे विसर्जनावेळी भक्तांना काहीशा अडचणींना सामाेरे जावे लागले. तसेच घारपुरे घाट, नवश्या गणपती, सोमेश्वर धबधबा तपोवन आदी भागांतही विसर्जनासाठी गर्दी झाली. यावेळी विविध धार्मिक व सामाजिक संस्थांतर्फे 'देव द्या देवपण घ्या'अंतर्गत मूर्तींचे संकलन करण्यात आले.
ऋषिपंचमीचा मुहूर्त साधत नाशिककरांनी गोदाघाटावर स्नानासाठी गर्दी केली. यावेळी महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. गोदेत स्नान केल्यानंतर नागरिकांनी श्री कपालेश्वर तसेच गोदाघाट परिसरातील छोट्या-मोठ्या मंदिरांमध्ये पूजन केले. दरम्यान, भद्रकाली चौकातील श्री साक्षी गणपती मंदिर ट्रस्टतर्फे ऋषिपंचमीचे औचित्य साधत सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडो महिलांना एका तालासुरात अर्थवशीर्षाचे पठण केले.