आजची तरुण पिढी पारंपरिक चविष्ठ पदार्थांपेक्षा “फ्युजन डिशेस”वर जास्त फिदा होत आहे. Pudhari News Network
नाशिक

Fusion Food : फ्युजन फूडचा आनंद घ्या, पण तब्येतही सांभाळा

डॉक्टरांचा इशारा: बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे नाशिकमधील तरुणाईचे आरोग्य धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक: श्रुती मोईन

आजची तरुण पिढी पारंपरिक चविष्ठ पदार्थांपेक्षा “फ्युजन डिशेस”वर जास्त फिदा झाली आहे. शहरातील विविध हॉटेलमध्ये तरुणाईच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी फ्युजन डिशेसचे नानाविध अविष्कार पहायला मिळत आहे. मिसळ, पावभाजी, डोसा, मॅगी, भेळ आणि वडापाव या पारंपारिक डिशेला आधुनिक रुप देताना अनेक हॉटेल्समध्ये त्यांच्यात नवनवीन पर्दाथांची मिसळ करण्यात आलेली आहे. “चवीसाठी सगळं चालतंय”… पण शरीर काय म्हणतंय? याचाही विचार तरुणांनी आधी करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

आधी मिसळ म्हणजे मटकीची उसळ असे समीकरण होते. परंतु ते आता मागे पडून त्याच्याजागी चीज मिसळ, चिकन मिसळ, शेजवान मिसळ, नॉनव्हेज मिसळ असे प्रकार आले आहेत. या मिसळवर तरुणाई रवि‌वारी आणि सुट्टीच्या दिवशी तुटून पडत आहे. तसाच प्रकार पावभाजीच्या बाबतीत झाला आहे. पावभाजी फक्त भाज्यांची नव्हे तर आता पनीर पावभाजी, तंदूर पावभाजी, चीज पावभाजी, शेजवान पावभागी, कोल्हापूरी पावभाजी, चिनी पावभाजी अशा नव्या रुपात आली आहे. डोश्यातही चीज डोसा, पिझ्जा डोसा, मंच्युरिअन डोसा, तंदुरी डोसा आदी प्रकार खवय्यांना दिले जात आहेत. भेळीत चायनीज, चीझ, मॅगी, राजस्थानी भेळ असे प्रकार उदयास आले आहेत.

वडापावही झाला आधुनिक

महाराष्ट्राची ओळख असलेला वडापाव आता शेजवान, पनीर, चीज, तंदुरी, बटर अशा प्रकारात सर्व्ह केला जात आहे. पारंपारिक वडापाव असा आधुनिक झाला आहे. वडापावची दुकानेही आधुनिक झाली असून रस्त्याच्या क़डेला दिसणारी दुकाने हळूहळू कालबाह्य होत चालली आहेत. तरुणाई बाकडे, कट्टे आणि आधुनिक माहोल असलेल्या वडापावच्या दुकांनात गर्दी करताना दिसत आहेत. नाशिकमध्ये गेल्या दोन वर्षात अशी सुमारे अडीचशे ते तीनशे अत्याधुनिक वडापाव दुकाने सुरु झालेली आहेत.

चव वाढली खरी, पण या बदलांनी शरीरावर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे तरुणाईचे साफ दुर्लक्ष होत आहे. जुने पदार्थ नव्या रुपात असले तरी त्यातील घटक शरीरासाठी किती प्रमाणात पाहिजे, याचा ताळेेबंदच नाही. पूर्वीचे पदार्थ घरगुती आणि पौष्टिक असायचे, पण त्यांची चव वाढवण्यासाठी अनेक कृत्रिम मिश्रणे, सॉसेस आणि चीज वापरले जाते. हेच शरीरासाठी घातक असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.

Nashik Latest News

भारतीय पदार्थांचे नवे प्रकार

  • मिसळ - चीज मिसळ, नॉनव्हेज मिसळ, शेजवान मिसळ, पनीर मिसळ

  • पावभाजी - पनीर पावभाजी, तंदुरी पावभाजी, चीज पावभाजी, शेजवान पावभाजी

  • दोसा - पिझ्झा दोसा, चीज दोसा, मंचुरियन दोसा, तंदुरी दोसा

  • मॅगी - मंचुरियन मॅगी, तंदुरी मॅगी, चीज मॅगी, पनीर मॅगी

  • भेळ - चायनीज भेळ, मॅगी भेळ, चीज भेळ

  • वडापाव - चीज वडापाव, शेजवान वडापाव, पनीर वडापाव

  • पराठा - पिझ्झा पराठा, चीज पराठा, पनीर पराठा

नवीन चवींचा आस्वाद घेणे चुकीचे नाही, पण त्यात मात्रा आणि आरोग्याचे भान आवश्यक आहे. घरगुती पारंपरिक पदार्थांची खरी मजा त्यांच्या साधेपणात, पौष्टिकतेत आणि चवीत आहे. निसर्गाशी जवळीक ठेवणारा स्वच्छ, नैसर्गिक आहारच उत्तम आहे.
डॉ. बाबासाहेब शिंदे, डॉक्टर

आरोग्यावरील दुष्परिणाम

  • लठ्ठपणा — जास्त तेल, बटर आणि चीजमुळे चरबीत वाढ.

  • पचनाच्या तक्रारी— शेजवान, सॉस आणि मसालेदार पदार्थांमुळे ॲसिडीडी, पोटफुगी.

  • त्वचा, केसांवर परिणाम — कृत्रिम रंग आणि फ्लेवर्समुळे त्वचेच्या स्वरुपात बदल

  • प्रतिकारशक्तीत घट: शरीरात आवश्यक पोषणद्रव्यांची कमतरता

  • कोलेस्ट्रॉल वाढ — चीज, बटर, नॉनव्हेजमुळे रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची समस्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT