Ramkund Flag Hoisting 
नाशिक

Ramkund Flag Hoisting | रामकुंडावर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाची जय्यत तयारी; राष्ट्रपतींच्या उपस्थितीसाठी रंगीत तालीम संपन्न

Ramkund Flag Hoisting | अूक मुहूर्तासाठी जय्यत तयारी : राष्ट्रपतींच्या हस्ते १० मिनिटे यज्ञ; ५ मिनिटे गौतमी- गोदावरी पूजन, दुपारी १२.०२ वाजता ध्वजारोहण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यातील प्रत्येक विधी अचूक वेळेत पार पाडावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि. २७) रामकुंडावर संपूर्ण कार्यक्रमाची रंगीत तालीम घेतली.

येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात १० मिनिटांचा यज्ञ, पाच मिनिटांत गौतमी - गोदावरी पूजन आणि दुपारी १२.०२ वाजता महाध्वजारोहण, असे वेळेचे नियोजन करण्यात आले आहे.

धार्मिक विधींपासून ते सुरक्षा, वाहतूक, मान्यवरांची बैठक व्यवस्था आणि गोदावरी आरतीपर्यंत प्रत्येक बाबीबाबत मिनिटांचा आढावा या रंगीत तालमीत घेण्यात आला. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अन्य विभागांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

रंगीत तालमीत अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपविभागीय अधिकारी अर्पिता टुबे, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, चंद्रकांत गवळी, किशोर काळे, तहसीलदार बाबासाहेब तांबे, पंकज पवार, अपर तहसीलदार अमोल निकम, दीपक चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी उपस्थित होते.

विमानतळापासून पाहुनी

राष्ट्रपती दौरयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विविध ठिकाणी रंगीत तालीम घेण्यात आली. सकाळी ९ वाजता नाशिक विमानतळावर राष्ट्रपतींचे आगमन, स्वागत, सुरक्षा, वाहनव्यवस्था आणि समन्वयाची पाहणी करण्यात आली. सकाळी १० वाजता महाराष्ट्र पोलिस अकादमीत आगमन, निवास, वाहन आणि प्रोटोकॉल व्यवस्थाचा आढावा घेतला.

सकाळी ११ वाजता सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याची रंगीत तालीम झाली. यात मंच, सुरक्षा, वाहतूक, धार्मिक विधी, शंखनाद, मान्यवरांची बैठक आणि विविध विभागांत समन्वयाची चाचणी करण्यात आली. सायंकाळच्या गोदाआरती, शंखनाद, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेक्षक व भाविकांची व्यवस्था, विधुत आणि ध्वनिंत्रणेसह अन्य सुविधांचा आढावा घेतला.

राष्ट्रपती कार्यालयाच्या मंजुरीनंतर वेळापत्रक

रंगीत तालमीतून निश्चित केलेल्या नियोजनाचा सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकारी अर्पिता टुबे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. जिल्हा प्रशासनाकडून हा अहवाल राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. तेथील मंजुरीनंतर विशेष सुरक्षा दलाचे पथक कार्यस्थळाची पाहणी करीत सुरक्षा व्यवस्थाचा आढावा घेतील.

त्यानंतर अंतिम नियोजन निश्चित केले जाईल. प्रत्येक विधी आणि व्यवस्थेचे वेळापत्रक निश्चितीच्या सूचना दिल्या, राष्ट्रपतींचे आगमन, स्वागत, धार्मिक विधी, महाध्वजारोहण कार्यक्रमांची सांगड घालणे प्रशासनासमोर आव्हान आहे. आमदार - खासदार व नगरसेवकांसाठी विशेष सोय करण्यात येणार आहे.

त्रुटींचे जागेवर निराकरणाच्या सूचना

सोहळ्यासाठी प्रत्येक विभागाने मनुष्यबळ, वाहने, साधनसामग्री, प्रवेश आणि निर्गमन मार्ग, सुरक्षाव्यवस्थाची प्रत्यक्ष स्थळावर खातरजमा केली. कार्यक्रमावेळी गर्दीचे नियोजन, वाहतुकीची हालचाल आणि विविध यंत्रणांत समन्वयाचा सराव करण्यात आला. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटींचे जागेवरच निराकरणाच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT