नांदगावच्या जागेवरुन महायुतीत संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  File
नाशिक

नांदगाव मतदासंघावरून भुजबळ विरुद्ध कांदे संघर्षाचा भडका उडणार?

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघावरून महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पंकज भुजबळ यांना राज्यपाल नियुक्ती आमदारांमध्ये स्थान दिल्यानंतरही मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघावर दावा कायम ठेवल्याने भुजबळ विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, भाजपकडून शुक्रवारी (दि. १८) काही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत नाशिक मध्य, निफाड आणि देवळाली या तीन मतदारसंघांवरून वाद सुरू असताना महायुतीलाही नांदगाव मतदारसंघ वादाचे चटके देणारा ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून समीर भुजबळ यांनी दावा केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मंत्री छगन भुजबळ यांनी 'नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जा', अशी पोस्ट केली होती. त्यामुळे शिंदे गट व विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार, असा सामना बघायला मिळाला होता. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पंकज भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यात आल्याने समीर भुजबळ नांदगावमधून माघार घेतली, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, समीर भुजबळ यांनी माघार न घेता पक्षाकडे नांदगाव विधानसभा मतदारसंघाची जागा घ्यावी, अशी विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघावरून महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT