पक्षी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणारे हरेश शाह हे 'बर्ड मॅन' ओळखले जातात. pudhari news network
नाशिक

Friendship Day : भुता परस्परे जडो ‘मैत्र जिवाचे'

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : निल कुलकर्णी

'भुता परस्परे जडो मैत्र जिवांचे' हे ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानात लिहून ठेवलेल्या ओवी प्रत्यक्षात उतरवणाऱ्या आणि पशू, पक्षी, वनस्पती, वृक्ष यांना आयुष्यभराचे मित्र मानणाऱ्या व्यक्ती नाशिकमध्येही दिसतात. यातील कुणी पक्षांशी मैत्री जोडली, कुणी शेकडो जखमी पशू-पक्ष्यांवर उपचाराने त्यांना पुनर्जन्म देत भूतदयेचा प्रत्यय दाखवत आहेत, तर कुणी मोकाट, श्वानांना प्रेम देऊन आसरा देत आहेत. (Friendship Day: 'Friendship' between animals, birds and humans)

माणसांचे डॉक्टर असूनही 'पक्ष्यांचे डॉक्टर' अशी ओळख सार्थ ठरवणाऱ्या निफाडचे उत्तमराव डेर्ले हे गेल्या १२ वर्षांत हजारो जखमी पाणपक्षी, रानपक्ष्यांसह रानमांजर, कोल्हे, खारी आदींवर उपचार करून त्यांना जीवनदान देत आहेत. पक्ष्यांमध्ये ते मित्र बघतात. पिंपळगाव निफाड रोडवरील रानमळा येथे अजस्र फिडर (पक्षी ज्यावर बसून दाणे खातात ते) लावून पक्षी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणारे हरेश शाह हे 'बर्ड मॅन' ओळखले जातात. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'मध्ये नोंद झालेल्या ४०० किलो वजनाच्या आणि ७०० किलो धान्य क्षमता असणाऱ्या या भव्य फिडरमधील दाणा खाण्यासाठी दिवसभरात किमान हजारो पक्षी येत असतात. शरण्या शेट्टी यांनी विल्होळी येथे मोकाट श्वान, गाढवे, वराह यांच्यासाठी होस्टेल सुरू करून अनेक मुक्या प्राण्यांना जीवनदान दिले आहे. मुक्या जिवांची मैत्री नेहमीच चिरकाल आणि आनंददायी असते. त्यामधून मोठे समाधान मिळते असे 'शरण' संस्थेच्या संस्थापक शरण्या शेट्टी सांगतात.

विविध पक्षी भव्य फिडरमधून दाणा खातात आणि आम्ही ठेवलेल्या वॉटर फिडरमधूनच पोटभर पाणी पिऊन जातात. हे दृश्य बघताना जग कवेत घेतल्याचे समाधान वाटते. पक्ष्यांशी मैत्री आनंददायी आहे.
हरेश शाह, पक्षिमित्र, अजस्र फिडरचे निर्माता, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
वृक्षांनाही आपला मित्र व शत्रू समजतो, ते भले शब्दांद्वारे बोलत नसतील, परंतु वृक्ष- वेली फुललेली पाने, फुले, फळांतूून मानवांपर्यंत भाव पोहोचवत असतात. वृक्षांशी बालपणी केलेली मैत्री आयुष्यभरासाठी जोडून ठेवली. ही मैत्री कधीही तुटणार नाही.
शेखर गायकवाड, वृक्षप्रेमी, नाशिक.
नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामुळे आमच्या परिसरात अनेक पक्षी आहेत. २००८ पासून जखमी पक्ष्यांवर उपचार करत आहे. हजारो पक्ष्यांवर प्रथमोपचाराची संधी ईश्वराने दिल्याचे समाधान आहे. उपचाराने पक्ष्यांना पुनर्जन्म मिळतो, हे बघताना आयुष्याचे सार्थक वाटते.
डॉ. उत्तमराव डेर्ले, पक्षिमित्र, निफाड. नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT