नाशिक : तीन वर्षांकरीता ठेका दिलेल्या मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी केलेल्या तरतुदीपैकी ६५ टक्के रक्कम दीड वर्षांतच संपुष्टात आल्याने या योजनेसाठी पुढील दीड वर्षांकरीता तब्बल ४.९० कोटींची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रस्तावाला गुरूवारी (दि. ४) महासभेत मंजुरी देण्यात आली आहे.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून सर्व धर्मियांसाठी मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व धर्मिय मृतदेहांवर अंत्यविधीसाठी साहित्य व सेवा पुरविण्यासाठी १७ जानेवारी २०२४ ते १७ जानेवारी २०२७ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी ठेका देण्यात आला आहे. यासाठी नाशिकपूर्व, पंचवटी, सिडको, नाशिकरोड व सातपूर या विभागांकरीता एकूण ७.४२ कोटींच्या खर्चास वित्तीय मान्यता देण्यात आली होती. ठेका दिल्याच्या दिनांकापासून गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत या योजनेवर आतापर्यंत ४.५३ कोटींचा खर्च झाला आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता आणखी दीड वर्षांचा कालावधी उरला आहे. मात्र वित्तीय मान्यतेपैकी केवळ २.८८ कोटी रुपयेच शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण कालावधीकरीता योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण ७.७९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे उर्वरित ४.९० कोटींच्या वाढीव खर्चास वित्तीय मंजुरीचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.