Fraud Case 
नाशिक

Nashik Pharma Fraud | बनावट कागदपत्रांद्वारे 1.73 कोटींची फसवणूक; नाशिकमधील औषध उत्पादक कंपन्यांना गंडा

Nashik Pharma Fraud | बनावट कागदपत्रांद्वारे 1.73 कोटींची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बनावट आयएसओ प्रमाणपत्रे, खोटी व्यावसायिक माहिती आणि दिशाभूल करणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे दोन औषध उत्पादक कंपन्यांची तब्बल १ कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनयकुमार ओमप्रकाश (६२), सेल्स मॅनेजर, प्लाशा इंडस्ट्रीज प्रा. लि., अहमदाबाद (गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत नाशिकमधील डॉक्टर हाऊस इमारतीतील कार्यालयातून संबंधित व्यवहार करण्यात आले. संशयित तुषार (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात), अथर्व भिडू वाघमारे (रा. गणराज अपार्टमेंट, कोपरखैरणे, नवी मुंबई) आणि अचिन भिडू मोरे (रा. नखचर, ता. दिंडोरी) यांनी स्वतःला औषध व्यवसायाशी संबंधित अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवले.

त्यांनी बनावट आयएसओ प्रमाणपत्रे, खोटी व्यावसायिक कागदपत्रे व ई-मेलद्वारे पाठविलेली बनावट प्रमाणपत्रे सादर करून तसेच वेबसाईटवर खोटी माहिती प्रदर्शित करून फिर्यादी कंपन्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयितांनी प्रीगॅबालिन, तेल्मीसार्टन, लेव्होसल्प्राइड आणि एटोरिकॉक्सिब या औषधांच्या मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी वेळोवेळी ऑर्डर दिल्या.

सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये दिलेले धनादेश वटल्याने फिर्यादींना संशय आला नाही. मात्र, त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात माल मागवून त्या बदल्यात दिलेले धनादेश बँकेत सादर करण्यापूर्वीच संशयितांनी कार्यालय बंद करून पलायन केले. त्यामुळे मालाचा मोबदला न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.

या प्रकारात प्लाशा इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीचे ७७ लाख ५९ हजार ११६ रुपये, तर जीमपाल स्पेशालिटी मॉलिक्युल्स एलएलपी या सहकारी कंपनीचे ९६ लाख ११ हजार २२७ रुपये किमतीचा माल लांबस करण्यात आला. एकूण फसवणुकीची रक्कम १ कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपये इतकी आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तलवारे करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT