Ashok Kharat Case | नवरा-बायकोचा बुद्धिभेद करून खरातने उद्ध्वस्त केले शेकडो संसार 
नाशिक

Ashok Kharat Case | नवरा-बायकोचा बुद्धिभेद करून खरातने उद्ध्वस्त केले शेकडो संसार

पुढारी वृत्तसेवा

निखिल रोकडे

नाशिक : स्वतःला ज्योतिषी आणि दैवी शक्तीचा धनी म्हणून सादर करणार्‍या भोंदू अशोक खरात याचे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. आपल्या अडचणींचे समाधान मिळावे, या प्रामाणिक अपेक्षेने त्याच्याकडे येणार्‍या नागरिकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने अनेक कुटुंबांमध्ये फूट पाडत त्यांचे संसार उद्ध्वस्त केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच, त्याच्याकडे येणार्‍या दाम्पत्यातील महिलांशी त्याने शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. यातूनच तो पती-पत्नीच्या नात्यात संशयाचे विष पेरून त्याचा कपटी डाव साधत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरातकडे येणार्‍या व्यक्तींना तो सुरुवातीपासूनच आपल्या बोलण्याच्या प्रभावाने जाळ्यात ओढत असे. पतीला व त्याच्या मुलांना समोर बसवून पत्नीला बाहेर थांबवले जाई आणि त्यानंतर दैवी शक्तीचा हवाला देत पतीच्या मनात संशय निर्माण केला जाई. तुमचा मुलगा तुमचाच नाही किंवा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणींना तुमची पत्नी जबाबदार आहे, असे खोटे आणि भ्रामक विधान करून तो पतीच्या मनोविश्वावर परिणाम करत असे. याचबरोबर, तुमच्या जीवनात आनंद निर्माण करायचा असेल तर तुम्ही पती-पत्नीने एकमेकांपासून दूर राहा, संबंध ठेवू नका, असा सल्ला देत तो दोघांमध्ये दुरावा वाढवत असे. विशेष म्हणजे, तो पती आणि पत्नी या दोघांनाही वेगवेगळे बोलावून प्रथम पूर्ण विश्वासात घेत असे आणि ही गोष्ट एकमेकांना सांगायची नाही, अशी खात्री करून घेत असे. त्यामुळे दोघांमध्ये संवादच तुटून जात असे आणि संशय अधिक गडद होत जाई. यानंतर काही दिवसांनी पत्नीला एकटीला बोलावून, पतीच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जाई. पती विश्वासघातकी आहे, तो तुमच्याशी प्रामाणिक नाही, अशा प्रकारचे आरोप तिच्या मनात रोवले जात. या दुटप्पी आणि योजनाबद्ध वर्तनामुळे पती-पत्नीमध्ये अविश्वासाची दरी निर्माण होऊन ती वाढत जाई.

खरातचा माईंडगेम

* पती-पत्नीला स्वतंत्र बोलावून त्यांच्या मनात एकमेकांविषयी विष कालवायचा

* एकमेकांपासून दूर राहा, संबंध ठेवू नका, तरच चांगले होईल असा सल्ला द्यायचा

* महिलेच्या मनात पतीविषयी अविश्वास निर्माण करून स्वत: संबंध ठेवायचा

विकृतीचा कळस ‘ओश्नो जल’

लैंगिक विकृत असलेल्या खरातचे वेगवेगळे कारनामे उघडकीस येत आहेत. यामध्ये वायग्रा गोळ्यामिश्रित ‘ओश्नो जल’ हे त्याच्या भक्त परिवाराला तो देत असे. त्याच्याकडे येणार्‍या श्रीमंत व्यक्ती हे जल शारीरिक संबंध ठेवण्यासाठी घेत असत. 10 वायग्रा गोळ्या पाण्यामध्ये मिश्रण केल्या जायच्या, त्यानंतर त्या पाण्याचे समान वाटप करून प्रत्येकी एक ग्लास तो श्रीमंत प्रतिष्ठित व्यक्तींना देत असे. विशेष म्हणजे, या पाण्यास मोठी मागणी होती. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या मोठमोठ्या गाड्या पाठवून त्याच्याकडून हे जल घेऊन जात असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT