FOMO
राज्यातील ७५ टक्के तरुणाई 'फोमो' फेऱ्यात  File Photo
नाशिक

FOMO | राज्यातील ७५ टक्के तरुणाई 'फोमो' फेऱ्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : स्मार्ट फोनवरील वाढते व्यवहार. स्वस्त, सहज उपलब्ध होणाऱ्या नेटसुविधा, डाटा, सत्याभासी जग म्हणजेच वास्तव अशी मनोधारणा यामुळे राज्यातील ७५ टक्के तरुणाईला 'फोमो' अर्थात 'फिअर अॉफ मिसिंग'चा विळखा पडला आहे. 'कनेक्टिंग अॅण्ड कम्युनिकेटिंग अॉनलाइन'ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार संपूर्ण जगात 'फोमो'मुळे ग्रासलेल्या तरुणाईचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक असल्याचे नाेंदवले गेले. आज सहज उपलब्ध होणारे स्मार्ट फोन आणि स्वस्त डाटा यामुळे 'फोमो'च्या प्रमाणात देशातील सर्वाधिक प्रगत असलेल्या महाराष्ट्रात या समस्येने त्रस्त व्यक्तींचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे निरीक्षण मनोअभ्यासक, तज्ज्ञांनी नोंदवले.

'फोमो'मुळे तरुणाई सोशल मीडिया आणि ॲप्सवरून हायपर-कनेक्टेड जगात लीलया वावरतात, परंतु वास्तविक जगाशी त्यांचा संपर्क तुटतो. युवा नवीनतम पोस्ट, चॅट, आमंत्रण, बातम्या, गॉसिप इत्यादीसाठी त्यांचे फोन सतत तपासत राहतात. न पाहिल्यास त्यांना अस्वस्थता, बैचेनी जाणवते. आभासी जगातील फॅशन, पर्यटन, वाहनांमुळे ते त्यांना शॉपिंग, गेमिंग, नवीनतम ट्रेंड बघणे आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी धडपडताे. मात्र ते मिळले नाही की अस्वस्थता जाणवते. 'स्क्रीनटाइम'मध्ये वाढ आणि शेवटी मोबाइल हातातून सुटत नाही. रिल्स, स्टेटस, फोटोज् अपडेट करणे, आभासी जगातील 'ट्रेंड'चे अनुसरण यामुळे मोबाइलपासून दूर राहिल्यास तरुणाई बैचेन हाेते. यातूनच मनोव्यापार बिघडण्यासह शारीरिक आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले.

काय आहे फोमो..?

मोबाइल, इंटरनेट, सोशल माध्यमांपासून मुले, व्यक्ती काही काळ दूर राहिल्यास मोबाइल हातात घेऊन तिथे परतण्याची अनिवार्य, अनियंत्रित ओढ. मोबाइल हातात न राहिल्यास चिडचिडेपणा, अस्वस्थता, त्रागा यामुळे नातेसंबंध बिघडणे, शारीरिक आजार, निद्रानाश, कामावर, अभ्यासावर लक्ष केंद्रित न होणे असे दुष्परिणाम आढळतात. हा आजार नसून लक्षणे आहेत. त्यालाच 'फोमाे' म्हटले जाते.

'फोमो' लक्षणे

अभासी जगाशी 'कनेक्ट' राहण्यासाठी सतत मोबाइल, सोशल मीडियावर राहणे. कुणी काय म्हटले, काय 'कमेंट' टाकली, किती लाइक आले, 'लाइक्स' नसेल तर गमवल्यासारखे वाटणे, दुसऱ्यांच्या जगात काय सुरू आहे, कुठल्या विषयावरील चर्चा 'हिट' आहे, त्यावर माझी प्रतिक्रिया नसेल तर मी जगाच्या बाहेर पडेल असा गैरसमज बाळगणे. प्रोफाईल फोटो वाईट आहे असे मानत तो सतत बदलणे, रिल्सचा अतिरेक, एकटेपणा, न्यूनगंडाची भावना, आत्मविश्वासाची कमी आणि औदासीन्य, दिवसाकाठी शेकडो स्टेटस‌, फोटो बदलणे, मोबाइल क्षणभर दूर गेला तर बैचेनी, चिडचिड, जेवणाच्या वेळा बिघडणे, अतिजागरण, निद्रानाश.

फोमोतून मुक्तीच्या दिशेने कसे वळाल?

१) दिवसातील काही तास मोबाइल पूर्णपणे बंद ठेवणे. फोनवरून आलेल्या संदेशांना तात्काळ उत्तर न देणे. कुणी मिस कॉल केला किंवा संदेश पाठवला तर त्याला तात्काळ उत्तर न देता, समोरच्याला गरज असल्यास तो संपर्क करेल अशी भूमिका.

२) समाजमाध्यमे हे सत्याभासी जग असून, ते वास्तव नाही हे मनाला नेहमी समजवत राहणे, आयुष्याचा प्राध्यान्यक्रम ठरवणे, वाचन, गायन, चित्र, निसर्गभ्रमंती आदी वास्तव, छंदात वेळ घालवणे.

३) ध्यान, ओंकार जप, व्यायाम, योग याद्वारे मनोशक्ती वृद्धिंगत करणे.

युवा पिढीत मोबाइलचा 'फोमो' 'इलेक्ट्रॉनिक गॅझेट डिपेंडन्सी' म्हणतात. युवावर्गात ही लक्षणे 'कॉमन' असून, ती वाढत आहेत. त्यामुळे मुले एकटी राहू लागतात. स्वयंशिस्त, मोबाइल पाहण्याचे वेळापत्रक तयार करून तो वापरण्याबाबत सजग राहावे. अन्यथा यात वाहवत जाण्याचा धोका अधिक आहे.
डॉ. जयंत ढाके, मानसोपचारतज्ज्ञ
SCROLL FOR NEXT