बोरी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात फुलशेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने जलस्रोत विभागाचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते रविवारी करासवाडा, म्हापसा येथील जलस्रोत विभागाच्या कार्यालयात ६० हजार झेंडूच्या रोपांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांनी फुलशेती, फलोत्पादन तसेच भाजीपाला लागवडीकडे शाश्वत आणि फायदेशीर शेती व्यवसाय म्हणून वळावे, यासाठी सरकारकडून आवश्यक प्रोत्साहन व सहकार्य दिले जात आहे.
फलोत्पादन आणि भाजीपाला लागवडीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलस्रोत विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांना आवश्यक कृषी उपकरणे तसेच दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठीही सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक रोपवाटिका सक्षम झाल्यास शेतकऱ्यांना दर्जेदार लागवड साहित्य सहज उपलब्ध होईल आणि राज्यातील फळबाग लागवडीला मोठी चालना मिळेल, असेही मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. झेंडूच्या रोपांचे वितरण हा उपक्रम शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत विविध प्रकारच्या शेतीकडे वळण्यास, शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढविण्यास तसेच गोव्यातील फुलशेती, फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनाला बळकटी देण्यास उपयुक्त ठरणार आहे.
राज्यातील रोपवाटिका क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त करताना मंत्री शिरोडकर यांनी विशेषतः उत्तर गोव्यात दर्जेदार रोपवाटिकांची संख्या वाढविण्यावर भर दिला. शेतकऱ्यांना दर्जेदार काजू कलमे, आंबा कलमे, नारळाची रोपे तसेच विविध फळझाडांची लागवडयोग्य रोपे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी विशेष रोपवाटिका विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.१०