यावल आदिवासी विकास प्रकल्पातील मालोद येथील आश्रमशाळेत परीक्षेचा शुभारंभ करताना सहा. प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे. सोबत सहा. प्रकल्प अधिकारी (शिक्षण) राजेंद्र लवणे आणि मुख्याध्यापक, शिक्षक आदी. Pudhari News Network
नाशिक

'पुढारी टॅलेंट सर्च' परीक्षेला साडेपाच हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Nashik । तळोदा, यावल प्रकल्पातील 59 आश्रमशाळांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने दैनिक पुढारी आणि आदिवासी विकास आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेला तळोदा आणि यावल प्रकल्पातील 59 आश्रमशाळांमधील सुमारे साडेपाच हजारपेक्षा अधिक आदिवासी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

दैनिक पुढारीच्या वतीने तळोदा आणि यावल आदिवासी प्रकल्पातील इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा गुरुवारी (दि.17) सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवजीवन परीक्षेच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रम असलेल्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेसाठी गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी आणि इंग्रजी अशा चार विषयांवर दोनशे गुणांचा पेपर घेण्यात आला. पेपरमध्ये वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पद्धतीचे शंभर प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अनुभव मिळावा म्हणून उत्तरपत्रिकेसाठी आधुनिक ओएमआर शीटचा वापर करण्यात आला. तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 42 शासकीय आश्रमशाळांमधील इयत्ता चौथी ते सातवीच्या निवडक 3300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी, तर यावल प्रकल्पातील 17 आश्रमशाळांमधील इयत्ता चौथी ते सातवीच्या निवडक 2400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा दिली.

तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत टॅलेंट सर्च परीक्षेदरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील लोभाणी आश्रमशाळेला भेट देताना सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) के. सी. कोकणी, दैनिक पुढारीचे कोल्हापूरचे वितरण व्यवस्थापक अशोक पाटील आणि मुख्याध्यापक शिक्षकवृंद आदी.

उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकावर होणार आहे. परीक्षा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तळोदा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर (भाप्रसे) आणि यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. दैनिक पुढारीचे सरव्यवस्थापक सुनील लोंढे, नाशिक युनिटचे शाखा व्यवस्थापक राजेश पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब वाजे यांनी परीक्षा योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी नियोजन केले. परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना रोल नंबर देण्यात आले. रोल नंबरनुसार सर्व परीक्षा केंद्रांवर बैठकव्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून सर्व परीक्षा केंद्रांवर उत्साहाचे वातावरण होते. परीक्षेबाबतची उत्कंठा विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. बैठकव्यवस्था आणि पेपर कशा पद्धतीने सोडवावा याबाबतचे मार्गदर्शन संबंधित शिक्षक आणि पुढारी परिवाराने केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये, म्हणून 'पुढारी' टीमने सर्वतोपरी काळजी घेतली. परिणामी, सर्व परीक्षा केंद्रंवर परीक्षा सुरळीतपणे पार पडली. परीक्षेदरम्यान आदिवासी प्रकल्पातील उच्च पदस्थ आणि शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन परीक्षा प्रक्रियेचे प्रत्यक्ष अवलोकन केले. परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. टॅलेंट सर्च परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण होते. परीक्षेच्या सरावामुळे टॅलेंट परीक्षा विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतात. नियमित होणार्‍या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावे यासाठी या उपक्रमाचा उपयोग होत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक शिक्षणप्रेमींनी दिल्या.

तळोदा प्रकल्पांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील बोर्डी आश्रमशाळेत पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा - 2025 देताना विद्यार्थी.

तळोदा प्रकल्प : 42 आश्रमशाळा ; 3300 विद्यार्थी

तळोदा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रकल्प अधिकारी प्रभाग गायकवाड, के. सी. कोकणी तसेच अधिकारी अनय साबळे, उत्तम राऊत, रोहन वसावे यांनी परीक्षेचे नियोजन केले. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी दैनिक 'पुढारी'चे कोल्हापूरचे वितरण व्यवस्थापक अशोक पाटील, नाशिकचे वितरण व्यवस्थापक शरद धनवटे तसेच मुख्याध्यापक व शिक्षकवृंद आदींनी परिश्रम घेतले.

यावल प्रकल्पांतर्गत वैजापूर आश्रमशाळेत पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा - 2025 देताना विद्यार्थी.

यावल प्रकल्प : 17 आश्रमशाळा; 2400 विद्यार्थी

यावल विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूर, राजेंद्र लवणे, पी. व्ही. पाटील, जावेद तडवी, संदीप पाटील यांनी परीक्षेचे योग्य पद्धतीने नियोजन केले. परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रकल्प कार्यालयातील विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन सूचना दिल्या. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच दैनिक 'पुढारी'तर्फे राजेंद्र महाजन यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT