नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे भीषण आग लागल्याचे चौकशी अहवालात उघड झाल्यानंतर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात गुन्हा नोंदवला आहे. या आधी 2023 मध्ये लागलेल्या आग प्रकरणीही कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता अशाच प्रकारचा दुसरा गुन्हा नोंदवला गेला आहे.
21 मे रोजी मध्यरात्री जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती. तब्बल 56 तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. आगीचे रौद्ररूप पाहता पंचक्रोशीतील गावकर्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी नाशिकसह, इगतपुरी, ठाणे अग्निशमन दलाने कसोशीने प्रयत्न केले होते. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी, कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. याशिवाय निसर्गसंपन्नतेलाही हादरा बसला होता.
यापूर्वी 2023 मध्येही ‘जिंदाल’मध्ये अशीच भीषण आगीची घटना घडली होती. त्यात कामगारांचा मृत्यूही झाला होता. दुसर्यांदा अशीच आपत्ती ओढवल्याने, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकाराची गंभीर दखल घेत, कंपनीला क्लोजर नोटीस बजावली होती. याशिवाय आगीच्या कारणाचा उलगडा व्हावा यासाठी चौकशी समितीही नेमली होती.
औद्योगिक सुरक्षा विभागाच्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, व्यवस्थापनाने कंपनीत कामाची सुरक्षित पद्धत न अवलंबवल्यामुळेच आगीची घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या आधारे विभागाने गेल्या 1 जुलै रोजी कंपनी व्यवस्थापनाविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या या कारवाईमुळे व्यवस्थापनाला हादरा बसला आहे.
2023 मध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत एक पुरुष व दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. तर 22 कामगार जखमी झाले होते. यावेळी स्थानिकांनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यावेळी कंपनीचे सात अधिकारी, भोगवटादार, कारखाना व्यवस्थापक, वाणिज्य विभागप्रमुख, उत्पादन व्यवस्थापक, देखभालप्रमुख, पाळीप्रमुख आणि यंत्रचालक यांच्याविरोधात घोटी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 304 (अ), 337, 338, 285, 287, 34 अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास अहवाल अद्यापही समोर आलेला नाही.
आगीच्या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील मुंढेगाव व पंचक्रोशीतील पाच गावांमध्ये हवा आणि पाण्याचे नमुने घेतले होते. तब्बल चार ते पाच दिवस आगीच्या धुराचे लोट इगतपुरी तालुक्यातील वातावरणात असल्याने, त्याचा हवा व पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती वर्तविली जात होती. दरम्यान, याबाबतचा अहवाल येणे बाकी आहे. अहवालात काही नकारात्मक बाबी आढळून आल्यास, ‘जिंदाल’वर ‘एमपीसीबी’कडून दंडात्मक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. हवा आणि पाण्याचे किती नुकसान झाले याच्या तीव्रतेवर दंडाची रक्कम अवलंबून असेल.
चौकशी अहवालात ‘जिंदाल’ने सुरक्षेबाबत केलेल्या त्रुटी समोर आल्या आहेत. स्क्रॅपमुळे आग लागल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.अंजली आडे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग