नाशिक : तांत्रिक संवर्गातील ११४ आणि अग्निशमन विभागातील १८६ अशा एकूण ३०० पदांसाठी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या नोकरभरतीकरीता अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. तांत्रिक कारणास्तव अर्ज प्रक्रियेची मुदत १६ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
महापालिकेच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मार्फत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. तांत्रिक संवर्गातील ११४ पदे ही विविध अभियंता पदांची तर फायरमनसाठी १५० आणि वाहनचालकच्या ३६ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. १ डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची अशी माहिती उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
तांत्रिक कारणांमुळे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक संवर्ग आणि अग्निशमन विभाग या दोन्ही विभागांसाठी अनुक्रमे ११४ आणि १८६ पदांसाठी भरती होत आहे.लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त प्रशासन विभाग
राज्य शासनाने कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय, आरोग्य व अग्निशमन विभागातील ७०६ पदांच्या भरतीला मंजुरी देत वर्षभरासाठी आस्थापना खर्चाची मर्यादा शिथिल केली होती. मात्र संबंधीत काळात भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. या भरतीसाठी देखील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससोबत करार करण्यात आला होता. आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती नियोजनाचा भाग म्हणून राज्य शासनाने पुन्हा एकदा आस्थापना खर्चाची अट शिथिल करत महापालिकेला भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत.