नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक राजकारणातील इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता थेट स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच निर्यातीच्या संकटात सापडलेला शेतकरी आता खते आणि तणनाशकांच्या दरवाढीमुळे पुरता होरपळला आहे. कच्च्या मालाचा पुरवठा खंडित झाल्याने खतांच्या किमतीत सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. एकीकडे द्राक्षे, केळी आणि कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना आपला माल स्थानिक बाजारात मातीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यातच आता शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या निविष्ठांचे दर गगनाला भिडले आहेत.
खत आणि तणनाशक तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने आखाती देशांतून आयात केला जातो. युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. खतांच्या ५० किलोच्या एका गोणीमागे १५० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तणनाशकांचे दरही प्रतिलिटर १०० ते १५० रुपयांनी वधारले आहेत.
मौरा ७१ तणनाशकाची एक लिटरच्या पावडरची अगोदरची किंमत ६५० रुपये होती. सध्या ती ८०० रुपये झाली आहे. टू फोर डी या तणनाशकाची एक लिटरची किंमत ३०० होती. आता ती ३७० रुपये झाली आहे.
युरियाच्या किमती सध्या तरी स्थिर आहेत. परंतु, त्यातही महिनाभरात वाढ होण्याची शक्यता आहे. आता उन्हाळा सुरू आहे. जून महिन्यात पेरणीवेळी या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
व्यापाऱ्यांकडून साठेबाजी
बाजारात आगामी काळात टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने मोठ्या व्यापाऱ्यांनी खते आणि तणनाशकांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला दर आणखी वाढवून नफा कमवण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांनीही संभाव्य दरवाढ टाळण्यासाठी आतापासूनच खतांची खरेदी करत साठवणूक करण्यास सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दुष्काळात तेरावा महिना या उक्तीप्रमाणे, नैसर्गिक संकटाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता या 'युद्धजन्य' महागाईचे नवे संकट उभे ठाकले आहे.
खतांच्या किमतीत झालेली मोठी दरवाढ आणि खतविक्रीतील 'लिकिंग'च्या जाचक अटींमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. १ एप्रिलपासून खतांच्या किमतीत प्रतिबंग १२५ ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यात १०:२६:२६ आणि १२:३२:१६ सारख्या प्रमुख खतांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आधीच बळीराजा कोलमडला आहे. त्यात ही दरवाढ अन्यायकारक आहे, असे भगरे यांनी नमूद केले. खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती थांबवावी, अनुदान वाढवून दरवाढ मागे घ्यावी आणि सहकारी संस्थांचे संरक्षण करावे. याबाबत केंद्रीय रसायने व खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना पत्र देत, तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.- भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी