नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुलगी झाली म्हणून तसेच पैशासाठी पत्नीचा छळ करीत हत्या करणाऱ्या पतीला नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भाऊसाहेब मधुकर ढिकले असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी हा निकाल दिला. आईच्या हत्येचा थरार डोळ्यांनी पाहणाऱ्या दिव्याची साक्ष निर्णायक ठरली.
सिद्धपिंप्री येथील अश्विनी भाऊसाहेब ढिकले यांचा विवाह दि. १७ एप्रिल २००८ रोजी भाऊसाहेब याच्याशी झाला होता. मुलगी दिव्या तिच्या जन्मानंतर पती, सासू आणि नणंदेकडून तिचा छळ सुरू झाला होता. ट्रॅक्टरसाठी पैसे आणण्याचा तगादाही लावण्यात येत होता.
दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी कपाटाचे कुलूप तोडल्याच्या कारणावरून संतप्त भाऊसाहेबने अश्विनीला खोलीत डांबून काठीने चेहरा व डोळ्यांवर बेदम मारहाण केली होती. अश्विनी बेशुद्ध पडल्यानंतर तिला शेतातील विहिरीत फेकून दिले होते. त्यात तिचा मृत्यू झाला. आईवर झालेला हा अत्याचार चिमुकल्या दिव्याने प्रत्यक्ष पाहिला होता. तिची न्यायालयातील साक्ष आरोपीला दोषी ठरवण्यात निर्णायक ठरली.
सासू ताराबाई मधुकर ढिकले व नणंद गीता संपत आहेर यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी, अनिल निवृत्ती दळवी याला पुरावा नष्ट करण्याच्या प्रकरणात तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील आर. पी. गावित व भानुप्रिया पेटकर यांनी सहा साक्षीदार तपासले.
अपघाताचा बनाव उधळला:
हत्येनंतर विहिरीजवळ पाण्याचा तांब्या ठेवून अश्विनी पाणी शेंदताना पाय घसरून विहिरीत पडल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिस तपास आणि वैद्यकीय पुराव्यांतून मारहाणीच्या खुणा समोर आल्याने खुनाचा प्रकार उघडकीस आला.