Father ends life with two children over family dispute
चांदवड : पुढारी वृत्तसेवा
कौटुंबिक वादातून ३४ वर्षीय तरुणाने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. २६) तालुक्यातील दिघवद येथे घडली. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिस ठाण्यात मृताच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती व पत्नी सोनाली दौलत हिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती दौलत हिरे यांना सासरे रामभाऊ हिरे व सासू मीना रामभाऊ हिरे यांनी सतत मानसिक त्रास देत छळ करत फिर्यादीचाही विनयभंग केल्याने कुटुंबात वाद झाला. या गोष्टींचा राग येऊन दौलत रामभाऊ हिरे (३४) यांनी मुलगी प्रज्ञा (९) व मुलगा प्रज्वल (५) यांच्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चांदवड पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी चांदवड पोलिसांनी संशयित रामभाऊ भाऊराव हिरे, मीना रामभाऊ हिरे व मयत दौलत हिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.