अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर: वडिलांच्या प्रेमाला अंत नसतो असे म्हणतात. त्याचाच प्रत्यय साक्री तालुक्यातील ककाणी येथे आला. अत्यंत गरीब कुटुंबातील सुरेश तुकाराम सोनवणे यांनी आपल्या मुलाला किडनीदान करून त्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवले आहे. या त्यागामुळे एका पित्याच्या वात्सल्याची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे.
सुरेश सोनवणे हे सलून व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पत्नी दिव्यांग आहे, तर लहान मुलगा शुभम हा परिवाराला हातभार लावतो. मोठा मुलगा सागर सोनवणे याने बारावी व फायर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सागर किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होता. सागरला मागील तीन वर्षापासून धुळ्यातच नियमित डायलिसिस करावे लागत होते. डायलिसिसमुळे कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडत होता. मुलाची अवस्था पाहून सुरेश सोनवणे यांनी स्वतःची किडनी मुलाला देण्याचा धाडसी निर्णय घेतला. सर्व वैद्यकीय तपासण्या अनुकूल आल्याने आठ दिवसापूर्वीच धुळ्यात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
वडिलांमुळे नवा जन्म
डायलिसिसमुळे शारीरिक आणि आर्थिक अडचणी आल्या. मात्र गावातील लोकांनी, सरपंच सचिन बेडसे, ग्रामस्थ, आमदार मंजुळा गावित व परिसरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी जवळपास दीड लाखांची मदत करून मोठा आधार दिला. वडिलांनी किडनी दिल्यामुळे मला नवा जन्म मिळाला असल्याची प्रतिक्रिया सागर सोनवणे यानी दिली आहे.
किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरचा काळ महत्त्वाचा असतो. रुग्णाने सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.डॉ. विकास राजपूत