त्र्यंबकेश्वर (पुढारी वृत्तसेवा):
इगतपुरी तालुक्यातील वाघेरा येथील रहिवासी व तिसगाव नाका, कल्याण फाटा, जिल्हा ठाणे येथील कुटुंबातील २ मुली आणि त्यांचे वडील अशा तिघांचा बेझे धरणात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील माहेरवासीण तिच्या दोन मुली आणि पतीसह भाऊबीजेच्या सणाला आली होती. बुधवारी (दि. ११) सकाळी १० च्या सुमारास बेझे धरणावर फिरायला गेले असता, दोन्ही मुली ज्योती सुरेश भोर (१०) आणि हर्पदा सुरेश भोर (७) या धरणातील पाण्यात उतरल्या होत्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडायला लागल्या. हे पाहून वडील सुरेश नामदेव भोर (४४) हे त्यांना वाचवायला पाण्यात उतरले.
मात्र, त्यांनाही खोलीचा अंदाज आला नाही. तेदेखील पाण्यात बुडाले. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच धावपळ उडाली. पाण्यात बुडालेल्यांचा पोहणाऱ्यांनी शोध घेतला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दुपारी १२ च्या सुमारास तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.