Farmers Protest Pudhari
नाशिक

Farmers Protest | त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने शेतकरी आक्रमक; जव्हार फाट्यावर उद्या रास्ता रोको

Farmers Protest | उद्या रास्ता रोकोचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर करताना त्र्यंबकेश्वरचे नाव वगळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तालुक्यातील शेतकरी मंगळवारी (दि. २९) त्र्यंबकेश्वरच्या जव्हार फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करत शासनाच्या या धरसोडीचा निषेध करणार आहेत. शेतकरी पावसाच्या लहरीपणाने हवालदिल झालेला असताना सरकारने यादीत नाव न घेतल्याने जखमेवर मीठ चोळल्याची भावना निर्माण झाली असून, संपूर्ण तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे २५ वर्षांपूर्वी त्र्यंबक तालुक्याची निर्मिती झाली तेव्हा दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या पेठ तालुक्यातील ५८ गावे आणि इगतपुरी तालुक्यातील ४२ गावांचा समावेश करत १२४ गावांचा तालुका तयार झाला. शासन यंत्रणांनी अहवाल देताना पेठ आणि इगतपुरी या लगतच्या तालुक्यात दुष्काळ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात आलेल्या शेजारच्या १०० गावांमध्ये मात्र सर्व काही आलबेल, असा त्यामधून अर्थ ध्वनीत होत आहे.

याबाबत तालुक्यातील ग्रामीण भागात सरकारच्या कारभाराबाबत उपहासात्मक टिप्पण्या समाजमाध्यमात व्यक्त होत आहे. निसर्गाने भौगोलिक नकाशाच्या सीमारेषा विचारात घेऊन सर्वकाही आखणी केली असावी, असे मत व्यक्त होत आहे.

दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि त्यावर आधारित सर्व अर्थचक्र कोलमडून पडणार आहे. केवळ शेतीविषयक नुकसानभरपाई एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नसून लहान-मोठे व्यावसायिक, विद्यार्थी यासह सर्व घटकांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता.

यावर्षी खरीप हंगामात पाऊस उशिरा आला, त्यानंतर अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण केली आणि पुन्हा एकदा ओढ दिली आहे. मंगळवारी याबाबत रास्ता रोको करण्यात येणार आहे. त्याला सर्वपक्षीय आणि विविध संघटनांचा पाठिंबा आहे. त्यातही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथून पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जलसंपदामंत्री येथे येतील तेव्हा काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्याचा मानस येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

"त्र्यंबक तालुक्याच्या लगत असलेल्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. त्र्यंबक तालुक्यातील गावे पूर्वी त्याच तालुक्यातील आहेत. भौगोलिक परिस्थिती समान असताना त्र्यंबक तालुक्यातील शेतकरी कष्टकरी यांच्यावर अन्याय केला आहे."
- ज्ञानेश्वर महाले, वाधोली, ता. त्र्यंबकेश्वर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT