नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात कृती समितीच्या पहिल्या बैठकीत शेतकरी. 
नाशिक

Nashik Shirdi railway route protest-शिर्डी रेल्वे मार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

५ जुलैच्या महामेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : नाशिक शिर्डी रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाला विरोध करीत शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. या भागातील शेती पूर्णपणे नष्ट होऊन शेतकरी देशोधडीला लागणार असल्याने नाशिक, सिन्नर, संगमनेर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कृती समिती स्थापन केली आहे. या आंदोलनाची पुढील दिशा दि. ५ जुलै रोजी होणाऱ्या शेतकरी महामेळाव्यात निश्चित करण्यात येणार आहे.

नाशिक सिन्नर संगमनेर मार्गे पुणे रेल्वे मार्ग व्हावा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २६) नाशिकरोड देवळाली विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयात कृती समितीची पहिली बैठक झाली. अशोक रावजी खालकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत नाशिकरोड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवारात रविवारी (दि. ५) सकाळी १० वाजता शेतकरी महामेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध घटकांच्या सूचना घेऊन पुढील आंदोलनाची ठोस रणनीती आखण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.

बैठकीत शेतकरी नेते रमेश औटे यांनी शासनाच्या धोरणावर टीका करीत सांगितले की, बागायती शेती भूसंपादन करून कृषी संस्कृती उद्ध्वस्त होऊ देणार नाही, संगमनेरमार्गे रेल्वे झाल्यास कृषी माल थेट दक्षिण भारतात पोहोचण्यास मदत होईल तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. बंटी मराठे यांनी शिर्डीमार्गे रेल्वेची मागणी कोणाचीही नसल्याचा दावा करीत, राजकीय वादात सामान्य जनतेचे नुकसान होत असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांच्या हिताविरोधातील कोणताही मार्ग स्वीकारला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला, विजय जाधव यांनी नाशिक जिल्ह्यामधील २२ गावांतील जमिनी यापूर्वीच रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आल्याचे सांगत, नगर आणि पुणे जिल्ह्यांत झालेला खर्चही वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली.

११ गावांतील शेतकरी बाधित होणार

बैठकीत राजेंद्र जाधव यांनी शक्यता व्यक्त केली की, प्रस्तावित मार्गामुळे नाशिकरोड परिसरातील ११ गावांतील जमीन बाधित होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. या ११ बाधित गावांची स्वतंत्र बैठकही ५ जुलै रोजी सिन्नर फाटा मार्केट यार्ड येथे घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कैलास टिळे यांनी, राजकीय दबावातून हा मार्ग लादला जात असल्याचा आरोप करीत, बागायती शेती आणि ऊस उत्पादक गावांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले. भूसंपादन प्रक्रिया सुरू असल्यामुळे प्रत्येक गावाने आपल्या क्षेत्राची माहिती घेण्याचे आवाहन त्यांनी केले. खासदार वाजे यांनी रेल्वे मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बळवंत गोडसे यांनी केवळ लोकप्रतिनिधींवर अवलंबून न राहाता सर्व घटकांनी एकत्र येऊन आंदोलनाची वज्रमूठ मजबूत करण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT