Farmer saves goat from leopard attack
कळवण : पुढारी वृत्तसेवा
सप्तशृंगगडाखाली वसलेल्या नांदुरी घाट रस्त्यालगतच्या हॉटेल चैतन्य पार्कजवळील जंगलात बुधवारी (दि. ८) दुपारी एकच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रसंगी शेतकरी प्रकाश भोये (६०, रा. नांदुरी) यांनी धैर्य एकवटून शेळीचा पाय धरत आरडाओरड केली. हा आवाज ऐकून हॉटेलमधील ग्राहक, परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यामुळे बिथरलल्या बिबट्याने शेळीला ओढून नेण्याचा प्रयत्न सोडून महादऱ्याच्या जंगलात धूम ठोकली. शेळीच्या मानेवर खोलवर जखम झाली असली तरी उपचारांती तिची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेतकरी भोये हे आपल्या शेताजवळील डोंगरावर शेळ्या चारत असताना अचानक समोरून बिबट्या आला व त्याने एका शेळीवर झडप घातली. या अनपेक्षित प्रकाराने क्षणभर घाबरलेल्या भोये यांनी नंतर बळ एकवटत त्या शेळीच्या पायांना घट्ट पकडून मदतीसाठी धावा केला. वेळीच ग्रामस्थ धावून आल्याने बिबट्याने शेळीला सोडून जंगलात गुडूप झाला.
शेळीवर नांदुरी येथील प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. गावात ही घटना काही नवीन नाही. यापूर्वीही शेतकरी भगवान गवळी आणि सुरेश भोये यांच्या शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. आता तिसरी घटना घडली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडावर भाविकांची मोठी वर्दळ असताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी रामकृष्ण देवकर तसेच वनरक्षक बाली मंजूळकर व नाना राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. देवकरांनी पशुपालकांना आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले असून, या भागात लवकरच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले.