Ghee 
नाशिक

Nashik FDA Raid | नाशिकमध्ये सणासुदीच्या तोंडावर 'एफडीए'ची मोठी कारवाई! 397 किलो संशयास्पद तूप जप्त

Nashik FDA Raid | रविवार पेठेत पावणेतीन लाखांचे बनावट तूप ताब्यात; अन्न व औषध प्रशासनाचा दणका

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत शहरात ३९७.६० किलो संशयास्पद तुपाचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत तब्बल २ लाख ७५ हजार ८१२ रुपये आहे. ही कारवाई रविवार पेठेतील एका ठिकाणी करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी (दि. १०) रविवार पेठेतील संजय भागचंद बरूड यांच्या ठिकाणी तपासणी केली. या वेळी अन्न परवाना नसताना विविध ब्रँडचे तूप विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.

तसेच तुपाचा दर्जा कमी असल्याचा संशय आल्याने केएमपी कृष्णा काऊ घी, मधुली काऊ घी आणि श्रीमाई काऊ घी या तीन ब्रँडचा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

विनापरवाना अन्नविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यामुळे संबंधित पेढीला व्यवसाय तत्काळ बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाची ही विशेष तपासणी मोहीम पुढेही व्यापक स्वरूपात सुरू राहणार आहे. अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता, सुरक्षित साठवणूक, हाताळणी व विक्रीसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नांदगावात १६६ लिटर दूध नष्ट

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी मोहीम सुरू आहे. नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथे दि. ७ ऑगस्ट रोजी दूध विक्रेत्याची तपासणी केली असता, व्यवसायाची नोंदणी नसल्याचे आणि अस्वच्छ वातावरणात दूध साठवून ठेवल्याचे आढळले. प्रथमदर्शनी दूध विहित मानकांपेक्षा कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून नमुना घेण्यात आला असून, उर्वरित १६६ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT