Arrested Pudhari
नाशिक

Nashik Fake FDA Officers Arrested | खंडणी उकळणाऱ्या तिघांना चोवीस तासांत अटक

Nashik Fake FDA Officers Arrested | अन्न व औषध अधिकारी असल्याची बतावणी, दुकानदारांना धमक्या

पुढारी वृत्तसेवा

नाशिक, सिडकोः पुढारी वृत्तसेवा

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून रिटेल मार्ट दुकानचालकाला अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याची भीती दाखवत परवाना रद्द करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिस व गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ यांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.

रोशन चांगदेव गव्हाणे (वय ३५, रा. महाकाली चौक, सिडको), विजय चुनीलाल बागूल (वय ४३, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) व एक महिला या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी फिर्यादी रिजवान इब्राहिम खान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनुसार दोन पुरुष व एका महिलेने स्वतःला अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र दाखविले. दुकानातील अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्याचे सांगून कारवाई व परवाना रद्द करण्याची धमकी देत रोख रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंबड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान हा हा गुन्हा रोशन गव्हाणे, विजय बागूल आणि एका महिलेने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुगळे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे युनिट-२ चे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सपोनि गणेश मुगळे, संदीप शेवाळे, मुक्तारखान पठाण, भारती देवकर, गुलाब सोनार आदींनी कारवाई केली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

स्वतःला शासकीय अधिकारी सांगून बनावट ओळखपत्रांच्या आधारे कारवाईची भीती दाखवत कोणी खंडणी मागत असल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी किंवा एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT