Fake currency 
नाशिक

Fake Currency Racket | बनावट नोटांचा प्लॅन आखला 'इन्स्टाग्राम'वरून

Fake Currency Racket | तळेगाव प्रकरण : खऱ्या नोटांना केमिकल लावून फसवण्याचा डाव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव येथील बंगल्यात उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणातील सर्व पाचही संशयितांची ओळख 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली होती.

याच व्हर्च्युअल ओळखीचे रूपांतर प्रत्यक्ष कटकारस्थानात होऊन, १० लाखांच्या बदल्यात ३० लाख रुपयांचे आमिष दाखवत तब्बल १० लाखांना गंडा घालण्याचा हा प्लॅन रचल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी न्यायालयाने तेलंगणा व नाशिकच्या पाचही संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्थानिक संशयित गोकुळ दाते, हिरामण दाते आणि मच्छिंद्र घनदाट यांनी तेलंगणातील बनावट नोटा तयार करण्यात पटाईत असलेल्या अमरेश्वर आईथा व दासहरी सत्यई यांना नाशिकमध्ये बोलविले होते.

प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार केवळ बनावट नोटा छपाईचा नसून, आर्थिक फसवणुकीचा अधिक वाटतो, असा महत्त्वाचा खुलासा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी केला आहे. संशयितांकडे छपाईसाठी लागणारी फारशी आधुनिक यंत्रसामग्री मिळालेली नाही.

ते खऱ्या नोटांना केमिकल लावून शाई उमटवण्याचे नाटक करत होते. १० लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ३० लाख बनावट नोटा देण्याचे भासवून, समोरच्या व्यक्तीची मूळ १० लाखांची रक्कम घेऊन पोबारा करण्याचाच त्यांचा मुख्य कट होता, असे तपासात समोर आले आहे.

असा रचला प्लॅन

१० लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणायच्या आणि त्या मोबदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटा द्यायच्या, अशी डील झाली होती. व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी बंगल्यावर धाड टाकत हा बनाव उधळून लावला. या प्रकरणाचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या टोळीने नाशिकमधील या बनावापूर्वी आणखी कोणाकोणाला अशा प्रकारे केमिकलचा थर दाखवून १०-१० लाखांना गंडा घातला आहे का? या दृष्टीने ग्रामीण पोलिस सध्या सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. सोशल मीडियावरील अनोळखी लोकांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT