वणी : पुढारी वृत्तसेवा
पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणेगाव डाव्या कालव्यात कथितपणे मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे टाकल्याच्या गंभीर प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि. ६) वणी शहरातील के. आर. टी. हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कालव्यात छोटा हत्ती वाहनातून कुरकुरे, पापडी, मूगडाळ आदी खाद्यपदार्थांची पाकिटे मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेची छायाचित्रे व व्हिडिओ उपलब्ध असल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, घटना घडून १८ दिवस उलटले असून, आजही घटनास्थळी काही कथित मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे पडलेली असल्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकाराबाबत नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पाटबंधारे विभागाने अखेर दि. १८ ऑगस्ट रोजी वणी पोलिस ठाणे आणि वणी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला. मात्र, पत्र देऊन पाच दिवस उलटूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पाण्याशी संबंधित गंभीर घटना असताना केवळ पत्रव्यवहार करून प्रशासनाची जबाबदारी संपते का, असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
घटनास्थळी तातडीने पंचनामा करून पाकिटे जप्त करणे, त्यांची तपासणी करणे, पाण्याचे नमुने घेणे आणि संबंधितांचा शोध घेणे आवश्यक होते. मात्र, या दिशेने अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता घटनास्थळी काहीही नसल्याचे सांगण्यात आल्याचा नागरिकांचा दावा आहे.
मात्र, रविवारी (दि. २३) नागरिकांनी घटनास्थळी पाहणी केली असता काही पाकिटे अद्याप त्याच ठिकाणी पडलेली असल्याचे आढळून आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेली पाहणी नेमकी कितपत गांभीर्याने झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्न व औषध प्रशासनानेही या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करावा, उर्वरित पाकिटे जप्त करून त्यांची तपासणी करावी, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, वाहनाच्या आधारे संबंधितांचा शोध घ्यावा आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
"घटनेची दखल घेत पोलिस व ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. संबंधितांनी काय कारवाई केली, याची चौकशी करण्यात येईल. घटनास्थळी आजही पाकिटे आढळल्यास त्याचा पंचनामा करून नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल."— पी. आर. लोढे, उपअभियंता, पुणेगाव धरण
"पिण्याच्या पाण्याच्या कालव्यात मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे टाकली जात असतील, तर हा केवळ कचरा टाकण्याचा प्रकार नसून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषय आहे. प्रशासनाने केवळ पत्रव्यवहार न करता घटनास्थळी पाहणी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी."— सागर मोर, वणी ग्रामस्थ