नाशिक : अंजली राऊत
पारंपरिक नाटकांच्या भव्य पडद्यापासून सुरू झालेला रंगभूमीचा प्रवास आता थेट 'ब्लॅक बॉक्स' आणि 'मोबाइल थिएटर'सारख्या अत्याधुनिक प्रयोगांपर्यंत येऊन पोहोचला आहे. काळाच्या ओघात बदलत्या प्रेक्षकांची पसंती आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव यांमुळे नाशिकच्या नाट्यविश्वाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, नाशिकच्या प्रयोगशील कलावंतांनी या नव्या बदलांना आपलेसे करीत रंगभूमीवर नवे मैलाचे दगड रोवले आहेत.
रंगभूमी म्हणजे एके काळी भव्य सेट, मोठा रंगमंच आणि नेपथ्याची भरगच्च मांडणी असे व्यावसायिक नाटकांचे मुख्य वैशिष्ट्य मानले जायचे. मात्र, आता ही जागा 'मिनिमलिझम' म्हणजेच मोजक्या आणि प्रभावी मांडणीने घेतली आहे. नाटकाचा बाज पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे सरकल्यामुळे आजचा प्रेक्षकही प्रायोगिक नाटकांकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. नाशिकच्या कलावंतांची अनोखी भरारी हे नेहमीच सांस्कृतिक चळवळींचे केंद्र राहिले आहे. येथील स्थानिक दिग्दर्शक, लेखक आणि तरुण कलावंतांनी केवळ पारंपरिक कलामंदिरावर अवलंबून न राहता, स्वतःच्या नव्या जागा शोधल्या आहेत. नाशिकच्या कलावंतांनी शहरात विविध ठिकाणी 'ब्लॅक बॉक्स' संस्कृती रुजविली आहे.
जुन्या वाड्यांमध्ये, कॅफेच्या छतावर किंवा रिकाम्या हॉलमध्ये स्पॉटलाइटच्या साहाय्याने दर्जेदार नाटकांचे प्रयोग केले जात आहेत. संवादांमधील सहजता आणि वास्तववादी अभिनयाच्या जोरावर नाशिकचे तरुण रंगकर्मी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाट्यप्रवाहांशी स्पर्धा करीत आहेत. थोडक्यात सांगायचे, तर नाशिकची रंगभूमी आता केवळ 'थिएटर' पुरती मर्यादित राहिलेली नाही. बदलत्या तंत्रज्ञानाची जोड आणि कलावंतांची प्रयोगशीलता यामुळे नाशिकच्या नाट्यसृष्टीचा नवा चेहरा अधिक धाडसी आणि समृद्ध होत आहे. नाटक सादर करण्यासाठी ठराविक व्यासपीठ किंवा तांत्रिक साधनांची गरज ही संकल्पना आता बदलत आहे.
मोबाइल थिएटर, स्पॉटलाइट थिएटर अन् ब्लॅक बॉक्स थिएटरचा ट्रेंड हा बदलत्या रंगभूमीमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. ब्लॅक बॉक्स थिएटर यात आयताकृती खोली अन् चारही बाजूंनी भिंतीला काळा रंग असलेल्या एका छोट्या खोलीत हे नाटक सादर होते. व्यासपीठ आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर कमी राहते. केवळ रंगमंच नाही, तर रंगमंचाचा वापर नृत्य, संगीत मैफल, परिसंवाद, अभिवाचन, नाटकाच्या तालमी, पुस्तक प्रकाशन यांसारखे विविध कार्यक्रम येथे करता येतात.
भिंतींना काळा रंग असल्यामुळे या ठिकाणी प्रकाशयोजना व नेपथ्यासाठी कलाकारांना वाव मिळतो. थिएटरच्या देखभालीचा खर्च कमी शिवाय थिएटरचे शुल्कही आयोजकांनाही परवडते. मिनी थिएटर या गोष्टीची नाशिककरांना नितांत गरज होती, ती गोष्ट स्पॉटलाइटच्या माध्यमातून कलावंत आणि नाट्यरसिक अशा दोन्ही अंगांनी परिपूर्ण होत आहे. संभाजी स्टेडियमजवळील मायक्रो फोरम हॉल येथे स्पॉटलाइट थिएटरच्या माध्यमातून सादर होणाऱ्या नाट्यप्रयोगाला रसिकांकडून चांगली दाद मिळत आहे.
फिरते मोबाइल थिएटर रंगमंच किंवा कोणत्याही उपलब्ध जागेत, अगदी गच्चीवर किंवा बागेतही तत्काळ उभे राहणारे हे रंगभूमीचे स्वरूप आहे. नाटकाला प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाण्याचा हा यशस्वी प्रयत्न ठरत आहे. यामध्ये सोसायटी तिथे नाटकाचे सादरीकरणदेखील करता येत आहे.
गच्चीवरील नाटक
ही कन्सेप्ट महाराष्ट्रभर गाजली होती. अगदी तसेच नाटक विविध अंगाने प्रफुल्लित ठेवण्यासाठी ज्या अंगाने स्पॉटलाइट थिएटर काम करीत आहे, त्यामध्ये एकाहून एक असे दमदार नाट्यप्रयोग नाशिककरांना अनुभवयास मिळाल्यामुळे रसिकांकडून चांगली दाद मिळाली होती.
नवीन पिढीपर्यंत नाटकाची संहिता पोहोचावी, असा उद्देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयोग करू शकत आहोत. उपनगर आणि टागोरनगर येथे यशस्वी प्रयोग केले आहेत. या प्रयोगाला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळत आहे. संपूर्ण राज्यभर प्रयोग करायचे असून, यामध्ये नवीन प्रेक्षकांना जोडायचे आहे. मनोरंजनातून सामाजिक संदेश दिला जात आहे.
- संकेत सीमा विश्वास, अध्यक्ष चांगभलं फाउंडेशन, मोबाईल थिएटर
ललितकला केंद्र, नाट्यशास्त्र पदविका अभ्यास क्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अॅम्फी थिएटरलाही प्रतिसाद आहे. विद्यापीठात १५०० आसनक्षमता असलेले मोठे सभागृह तयार होत असून, पाच वडाच्या झाडांनी वेढलेले ललितकेंद्राचे अंगणमंच तयार होत आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चांगले व्यासपीठ मिळत आहे.
- सचिन शिंदे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ