सिडको : नाशिक शहराचा आर्थिक कणा म्हणून ओळख असणाऱ्या अंबड एमआयडीसी परिसरातील वाहतूक समस्यांवर उपाय म्हणून एक्सलो सर्कल येथे सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, ती उभारून 15 दिवस उलटूनही अद्याप सुरू झाली नसल्यामुळे सिग्नल कधी सुरू होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अंबड एमआयडीसी परिसरात दररोज हजारो कामगार, उद्योजक, मालवाहू वाहने व खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. विशेषतः एक्सलो सर्कल हा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू असून, येथे कायमच वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसते. मागील वर्षभरात या भागामध्ये अनेक किरकोळ व गंभीर अपघात झाल्याची नोंद आहे.
स्थानिक नागरिक, वाहनचालक व उद्योजकांकडून एक्सलो सर्कल येथे सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येथे आधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. सिग्नलचे खांब, दिवे व इतर यंत्रणा उभी असतानाही ती प्रत्यक्षात सुरू झाली नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत कोणताही बदल झालेला नाही. यंत्रणा उभी करून, ती सुरूच नसेल तर उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
अंबड एमआयडीसीतील एक्सलो चौकात सिग्नल यंत्रणा उभारली आहे. सिग्नल यंत्रणा त्वरित सुरू करण्यासाठी संबंधित अधिकारी यांची भेट घेणार आहे.निवृत्ती इंगोले, नगरसेवक
एक्सलो चौकात सिग्नल उभारावे, यासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. सिग्नल उभारण्यात आला आहे.शरद दातीर, सामाजिक कार्यकर्ते
अंबड तसेच सातपूर औद्योगिक वसाहतींत या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. एक्सलो चौकाप्रमाणेच पुढे संजीवनगर भागात सिग्नल यंत्रणा उभारली पाहिजे.अविनाश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते