विद्यार्थी गणवेशापासून वंचित pudhari file photo
नाशिक

Nashik | प्रजासत्ताक दोन महिन्यावर! अजूनही जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सहा महिने उलटूनही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत असून बागलाण, दिंडोरी, मालेगाव, नांदगाव, निफाड, पेठ, त्र्यंबक या सात तालुक्यांतील 65 टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित गणेवशाची प्राप्ती झाली आहे, तर उर्वरित 35 टक्के विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.

याशिवाय चांदवड, देवळा, इगतपुरी, कळवण, नाशिक, सिन्नर, सुरगाणा, येवला या आठ तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेशाची प्राप्ती झालेली नाही. 15 जूनला 2024 शाळा सुरू झाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियमित गणवेश एक आणि स्काउट गाइड एक असे दोन गणवेश प्रदान केले जातील, अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. घोषणेनुसार कापड पुरवठादार कंत्राटदाराकडून शालेय व्यवस्थापन समितीला गणवेश पुरविण्यात येणार होते. मात्र, सहा महिने उलटूनही अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. यामुळे मागील वर्षीच्या गणवेशावरच विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे.

बागलाण तालुक्यात 19 हजार 531 गणवेशांची आवश्यकता असून, केवळ 4882 गणवेश पुरविण्यात आले. अद्याप 14 हजार 649 गणवेशांची आवश्यकता आहे. दिंडोरीत 25 हजार 011 गणवेशांची मागणी असून 20,317 गणवेश पुरविण्यात आले. अद्यापही 4 हजार 694 गणवेश मिळणे बाकी आहे. याचप्रमाणे निफाड, पेठ, त्र्यंबक येथील 35 टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. चांदवड, देवळा, इगतपुरी, कळवण, नाशिक, सिन्नर, सुरगाणा, येवला या 8 तालुक्यांतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.

याशिवाय स्काउट गाइडचे गणवेशही विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. पेठ, सुरगाणा, त्र्यंबक येवला वगळता इतर तालुक्यांमधील विद्यार्थ्यांसाठी स्काउट गाइडचे गणवेश कंत्राटदार कंपनीकडून शालेय व्यवस्थापन समितीला प्राप्त झाले आहे. मात्र, गणवेश शिवण्याचे काम सुरू असल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT