नाशिक : मुंबई येथील ब्रिटिश उपउच्चायुक्तालय शिष्टमंडळाने नुकतेच सातपूर येथील निमा कार्यालयास भेट दिली. बैठकीत दोन्ही देशांमधील उद्योगांसाठी सहकार्य, परस्पर गुंतवणुकीच्या संधी आणि भविष्यातील औद्योगिक भागीदार यावर चर्चा करण्यात आले. तसेच युके येथील उद्योजक नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत नाशिक व यूके कंपन्यांमध्ये संभाव्य सहकार्य, संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि मेगा गुंतवणूक प्रकल्प आण्यासाठी चर्चा झाली. यूके सरकारच्या औद्योगिक धोरणात नमूद केलेल्या आठ प्राधान्य क्षेत्रांमध्ये नाशिकमधील उद्योजकांना संधी उपलब्ध होऊ शकते हे अधोरेखित करण्यात आले. विशेषतः संरक्षण, अवकाश, आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नाशिकची वाढती ताकद याकडे ब्रिटिश प्रतिनिधींचे लक्ष वेधले गेले. नाशिकच्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ याबाबतही माहिती देण्यात आली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेप्रमाणेच पायाभूत प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्ग व सुरत चेन्नई एक्सप्रेस महामार्गात नाशिकचा असलेला समावेश आणि विमानतळ सुविधा उद्योग व गुंतवणूकीस आकर्षित करणारे असल्याचे निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ गुंतवणूक सल्लागार लिनू नोबल कुरियन, बुरझिन लुथ, सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, निर्यात-आयात उपसमितीचे अध्यक्ष हर्षद ब्राम्हणकर, कैलास पाटील, सी. एस. सिंग, नूपुर बेंडले आदी उपस्थित होते.
नाशिकमधून होणाऱ्या आयटी, डेटा सेंटर, नागरी विमानांसाठी एमआरओ सेवा अशा प्रकल्पांमध्ये युके कंपन्यांसोबत भागीदारी किंवा गुंतवणूकीच्या शक्यता तपासण्यात येतील, असे ब्रिटन हाय कमिशनच्या गुंतणूक संचालिका सिद्धीका बॅनर्जी यांनी सांगितले. भविष्यातील गतिशीलता, ऑटोमोटिव्ह, प्रगत अभियांत्रिकी, सर्जनशील उद्योग, डिजिटल तंत्रज्ञान, जैविकशास्त्र, अन्न प्रक्रिया उद्योग, फार्मसी आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्याचे दरवाजे खुले ठेवण्यात आले असल्याची माहितीही बॅनर्जी यांनी दिली.