त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडे वीज मंडळाची ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंबोली धरणावरचा पुरवठा खंडित केला. यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात शनिवारी नगरपरिषदेचा पाणी पुरवठा बंद राहिला.
अंबोली धरणावर विद्युत पुरवठा खंडीत करणार असल्याने शनिवारी नियमित वेळेत पाणी पुरवठा होणार नाही, तसेच वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर उशीरा पाणी पुरवठा करण्यात येईल, असा संदेश समाज माध्यमावर शुक्रवारी रात्री फिरवला. मात्र, नागरिक बेसावध राहिले. शनिवारी दिवसभर पाणी पुरवठा झाला नाही. शहरात असलेली गर्दी, मार्गशीर्ष महिना असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे व्रतवैकल्य करताना खंडीत पाणी पुरवठा गृहिणींना डोकेदुखी निर्माण करणारा ठरला.
दरम्यान, याबाबत नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार थकबाकीतील काही रक्कम बँक खात्यावर वर्ग केली आहे. काही रक्कम सोमवारी भरणार आहेत. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अत्यावश्यक गरज असलेले पिण्याचे पाणी थांबेल, अशा प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, अशी नगरपरिषदेतर्फे वीज वितरण अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र, त्यांनी कोणतेही म्हणणे न ऐकता वीज पुरवठा खंडीत केला. त्र्यंबकेश्वरच्या १५ हजार नागरिकांसह देवदर्शनासाठी आलेल्या २५ हजार भाविकांना पाणी पुरवठा खंडीत करत वेठीस धरण्यात आले.निवडणूक असल्याने काही प्रमाणात घरपट्टी वसूल झाली, मात्र, वीजबिल, पथदीप देखभाल दुरुस्ती, पाणी पुरवठा मनुष्यबळ, साफसफाई या सुविधा ठेकेदारीने दिलेल्या आहेत. त्यांची देयके अदा करताना नगरपरिषद मेटाकुटीला येत आहे. नगरपरिषद फंडात खडखडाट निर्माण झाला आहे. नगरपरिषद निवडणूक सुरू असताना वीज वितरणच्या कारवाईने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची आलेली वेळ सत्ताधाऱ्यांबाबत नाराजी निर्माण करणारी ठरली आहे. याचा फटका मतदानात बसल्यास आश्चर्य वाटायला नको.
उत्पन्नात घट झाल्याने वीजबिल थकले
त्र्यंबक नगरपरिषदेला नियमीत उत्पन्न देणारा वाहनप्रवेश फी हा प्रमुख स्त्रोत होता. दर आठवड्याला सरासरी दोन ते अडीच लाख रुपये मिळत हाेते. टोईंग आणि पार्किंगमधून दर आठवड्याला ८० हजार रुपये मिळत होते. मात्र सद्य:स्थितीत शासन आदेशाने वाहन प्रवेश फी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वीज बिलासह आणखी काही आवश्यक असलेले नियमीत खर्च करणे नगरपरिषद प्रशासनास शक्य होत नाही.