Eknath Khadse file photo
नाशिक

Eknath Khadse News | आमदार एकनाथ खडसेंना मोठा दिलासा! कथित महार वतन जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Eknath Khadse News | महार वतन जमीन प्रकरण : 24 वर्षांनंतर तक्रार संशयास्पद

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात दाखल गुन्ह्यात आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा एकनाथ खडसे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. महार वतन जमीन प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील चमेलाबाई तायडे यांनी त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. २००२ मध्ये भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील महार वतन जमिनीवर (गट क्र. १२२) तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करणे, ५१ हजार रुपये टोकन देऊन जमीन हडपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या अनुषंगाने आ. एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलिस ठाण्यात फसवणूक, कागदपत्रांत फेरफार आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर खडसे आणि त्यांच्या कन्येने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची भुसावळ न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायाधीश एस. टी. सूर यांनी दोघांना अटकपूर्व जामीन मंजर केला आहे.

24 वर्षांचा मोठा उशीर

हा जमीन व्यवहार आणि फेरफार २००२ मध्ये झाला होता. तब्बल २४ वर्षांनंतर या प्रकरणी तक्रार दाखल झाली. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर फसवणूक किंवा बनावटगिरीचा शोध लागला, हा तक्रारदाराचा दावा संशयास्पद वाटतो.

तसेच हे प्रकरण केवळ दिवाणी स्वरूपाच्या वादाचे असून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तसेच जमीन हस्तांतरण आणि २४ वर्षांपूर्वीच कायदेशीर प्रक्रियेद्वारे झाला असल्याने, येथे अॅट्रॉसिटी कायद्याचे कलम ३(१) (एफ) आणि ३(१) (जी) प्रथमदर्शनी लागू होत नाही. त्यामुळे अटकपूर्व जामिनावर असणारी कायदेशीर बंदी (कलम १८) या प्रकरणाला अडसर ठरणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT