नाशिक : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या खेळाडूंसह मान्यवर. Pudhari News Network
नाशिक

Ekalavya School News : एकलव्य स्कूलच्या खेळाडूंची 'सुवर्ण' कामगिरी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 169 पदकांची लयलूट करत रचला इतिहास

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : ओडिशातील राउरकेलाच्या बिरसा मुंडा ॲथलेटिक्स स्टेडियमवर १० ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या चौथ्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली. त्यांनी तब्बल १६९ पदकांची लयलूट करत राष्ट्रीय स्तरावर इतिहास रचला. या खेळाडूंनी ३३ सुवर्ण, ६२ रौप्य, ७४ कांस्य पदके पटकाविले.

चौथ्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे महाराष्ट्राचे ५१६ खेळाडू सहभागी झाले होते. त्यात २६२ मुली तर २५४ मुलांचा समावेश होता. मैदान ते मॅट अशा सर्वच क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले. सर्वाधिक ३३ पदके स्विमिंग क्रीडा प्रकारात मिळाले. यात (९ सुवर्ण, ७ रौप्य, १७ कांस्य पदकांचा समावेश आहे. खेळाडूंनी कुस्तीत ६ सुवर्ण, १२ रौप्य, ९ कांस्य अशी २७ पदके जिंकली. खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये १६ पदके (८ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य) मिळवली.

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा शूटिंग, बॉक्सिंग, तायक्वांदो, ज्युदो आदी क्रीडा प्रकारात दबदबा दिसून आला. खेळाडूंनी शूटिंगमध्ये ५ सुवर्ण, व ४ रौप्य अशी ९ पदकांची कमाई केली. बॉक्सिंगमध्ये १४ पदके मिळाली. त्यात २ सुवर्ण, ५ रौप्य, ७ कांस्य पदकांचा समावेश आहे. तायक्वांदोमध्ये १३ पदके (१ सुवर्ण, १२ कांस्य) तर ज्युदोमध्ये १३ कांस्य पदके मिळवत यश संपादन केले. सचिन गिंबळ (स्विमिंग), अविनाश ढवळे (जिम्नॅस्टिक्स), प्रशांत आहेर, आयुषी (कुस्ती), ललिता दुबे (शूटिंग), शैलेंद्र सिंह, नेहा तिवारी (अॅथलेटिक्स) आदी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी केली.

यशस्वी खेळाडूंचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटीचे अध्यक्ष तथा आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटीच्या सदस्य सचिव तथा आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, उपायुक्त विनिता सोनवणे, सहायक आयुक्त अनिता दाभाडे आदींनी कौतुक केले.

Nashik Latest News

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या ५१६ खेळाडूंची १६९ पदकांची (३३ सुवर्ण, ६२ रौप्य, ७४ कांस्य) मिळवत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. हे यश आदिवासी विद्यार्थ्यांच्या अथक मेहनत, प्रशिक्षकांच्या समर्पण व एकलव्य स्कुलच्या यशस्वी अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण आहे. २६२ मुली व २५४ मुलांच्या या संघाने केवळ पदकेच जिंकली नाही, तर आत्मविश्वास, नेतृत्व व राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागवली आहे.
लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

सांघिक प्रकारातही यश

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सांघिक प्रकारातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. हॉकीमध्ये मुलांच्या संघाला तर खो-खो प्रकारात मुलींच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. हॅन्डबॉलमध्ये मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT