नाशिक

Ekadashi Ashadi Vari | राज ठाकरे यांचा सपत्नीक दोन दिवस नाशिक दौरा

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – मनसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळाच्या तयारीचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पुत्र अमित ठाकरे हेदेखील सोबत असणार आहेत. १९ व २० जून रोजी त्यांचा नियोजित दौरा असून, त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी प्रस्थान सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत.

रविवारी (दि.१६) राजगड कार्यालय येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबड, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाता ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांच्या दोन दिवसीय दौऱ्याची नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीत शहर व जिल्हा कार्यकारिणीचे तसेच पक्षाच्या सर्व अंगिकृत वाहिन्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्याच्या अनुषंगाने पक्षाचे त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक पदाधिकारी तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे, जिल्हा सचिव भूषण भुतडा यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा रूट प्लॅन वरिष्ठांना सादर केला. दरम्यान, १९ जून रोजी ठाकरे परिवार नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर २० जून रोजी ते पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या समाधीचे तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात त्र्यंबकराज यांचे ते दर्शन घेणार आहेत. यावेळी ते सर्व वारकरी संप्रदाय व दिंड्यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.

संत निवृत्तिनाथ महाराज यांचा व सकल वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद घेऊन राज ठाकरे तसेच मनसे नव्या ऊर्जेने, नव्या प्रेरणेने समाजसेवेचे कार्य उभे करणार आहे. वारकरी संप्रदाय व संत साहित्य ग्रंथासाठी भरघोस काम करण्याचा आमचा मानस आहे. संत निवृत्तिनाथ महाराज नाशिक जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्राचे वैभव असून, त्यांचे आशीर्वाद घेऊन आमची पुढील वाटचाल असेल. – सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT