कळवण (नाशिक) : स्वामी विवेकानंद फॉर एक्सलन्स, अजंग (ता. मालेगाव) येथील निवासी शाळेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पाचवीच्या २९ आदिवासी विद्यार्थ्यांनी, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जेवण व निवासाच्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे सोमवारी (दि. २३) भरपावसात कळवण प्रकल्प कार्यालय ते आदिवासी आयुक्तालय, नाशिक असा पायी मोर्चा काढत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नाही, आरोग्य सुविधा नाहीत, अन्न व पाणी मिळण्याची व्यवस्थाही निकृष्ट आहे. 2020 पासून मुळा पब्लिक स्कूल, सोनाई (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) किंवा अशाच दर्जेदार सुविधा देणाऱ्या शाळेत समायोजन करण्याची मागणी वेळोवेळी प्रकल्प कार्यालयाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने लेखी आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला आणि दिशाभूल केली, असे पालकांचे म्हणणे आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर विद्यार्थ्यांनी पावसात पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. वेळेत तोडगा न निघाल्यास आदिवासी आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात पालक साईनाथ चौधरी, वामन महाले, जिभाऊ गायकवाड, महेंद्र चौधरी, संदीप चौधरी, लक्ष्मण गावित, विलास बागूल, खंडू अहिरे, संजय अहिरे, अशोक राऊत, लक्ष्मण बागूल, मोहन खांडवी, विलास खांडवी आदी उपस्थित होते.
यासह विविध महत्त्वाच्या विषयांबाबत मी स्वतः प्रकल्प कार्यालयात बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत, तरी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने या मुजोर अधिकाऱ्यांवर आदिवासी आयुक्तांनी कारवाई करावी. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा.
- नितीन पवार, आमदार