येवला (नाशिक) : संतोष घोडेराव
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक होण्याच्या दृष्टीने येवला शहरात महिला कारागिरांकडून गायींच्या शेणापासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असून या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच दिव्यांग महिलांच्या हातालाही काम मिळत आहे. येथील कापसे फाउंडेशनने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
'वेस्ट पासून बेस्ट' काय करता येईल याचा विचार करून कापसे फाउंडेशनच्या संचालिका वंदना कापसे यांनी 'हर घर गणपती .. हर घर प्रकृतीचे संरक्षण' हे ब्रिद वाक्य डोळ्यासमोर ठेवून गेल्या तीन महिन्यांपासून महिला कारागीरांच्या मदतीने गायींच्या शेणापासून गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली आहे. यासाठी चाळीस महिला कारागीर दिवसाला तीनशे ते साडेतीनशे गणेशमूर्ती बनवत आहेत. यातील अनेक महिला या दिव्यांग असल्याने या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी येवल्यातील कापसे फाउंडेशनच्या महिला शेणापासून गणपतीमूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. यासाठी चाळीस महिला या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.
शेण, गम, मैदा, जोस, नीम पावडर, मुलतानी माती, मूर्तीचा सुगंध येण्यासाठी चंदन पावडर, माती, कागदाच्या लगद्याचा वापर करून छोट्या आणि मध्यम आकाराच्या गणेशमूर्ती बनविल्या जात आहेत. शेण व इतर नैसर्गिक साहित्याच्या वापरामुळे या मूर्तींचा विघटन कालावधी कमी असतो. विसर्जनानंतर जलस्रोतांना हानी पोहचत नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणपती मूर्ती बनवताना कोणत्याही रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंग, हळद, गेरू, कोळशाचा भुकटी अशा घटकांचाच वापर केला आहे. याच बरोबर देशी गायचे शेण आणि गोमूत्र
यापासून वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या जात आहेत. कुंडी, पणती शुभ- लाभ या सारखी विविधी मूर्त्याही या ठिकाणी बनविल्या जात असल्याचे वंदना कापसे यांनी सांगितले आहे.
सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, माऊत पब्लिसिटी बरोबरच पैठणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनाही पर्यावरणपुरक बनवलेल्या गणपतीची विक्री केली जाते.
'गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतानाच पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम येवल्यातील कापसे फाउंडेशन हाती घेतला आहे. भावनात्मक संदेश पोहोचविण्याचा मानस आहे.वंदना कापसे, कापसे फाउंडेशनच्या, संचालिका