पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिकच्या पेठ, हरसुल, सुरगाणा भागात रात्री 8:35 वाजता भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. पेठ, हरसुल, सुरगाणा हे तीनही आदिवासी बहुल तालुके आहेत. पेठ तालुक्यातील अनेक गावांना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जमिनीतून मोठा आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
पेठ तालुक्यातील मानकापूर, आडगाव भुवन धानपाडा आदी गावांमध्ये मंगळवारी रात्री ८.३० व ९.२७ वाजता धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागात अचानक धक्के जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले तर जमिनीखाली सतत होणाऱ्या हालचालीमुळे हे धक्के जाणवत असल्याचं भूगर्भ शास्त्रज्ञांनी म्हटलं असल्याची माहिती मिळत आहे.
तालुक्यातील आडगाव, पळशी खु, कडवईपाडा, घनशेत, धानपाडा यासह नराशी परिसरात दोन दिवसापासून जमीनीतून आवाज येत असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी अनेक ठिकाणी जमीन थरथरल्याचे जाणवले. हा भूकंपसदृश्य धक्का असून नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.