नाशिक : महामार्ग बसस्थानकात ई बस अचानक चौकशी कक्षावर आदळल्याची घटना शनिवारी (दि.७) रात्री १०.३०च्या सुमारास घडली. या अपघातात आंध्र प्रदेशमधून आलेल्या महिला प्रवाशाचा बसखाली सापडून जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अंजली थट्टीकोंडा- नागार्जुन (२३, रा. पटछवा, जि. प्रकाशम, राज्य आंध्र प्रदेश) असे मृत्यू झालेल्या महिला प्रवाशाचे नाव आहे.
शिर्डीहून नाशिकला (एमएच ०४ एलक्यू ९४६२) क्रमांकाची ई बस शनिवारी रात्री महामार्ग बसस्थानकात चौकशी कक्षासमोर थांबली होती. बसमधून प्रवासी खाली उतरल्यानंतर बसचालक उमेश दत्तात्रय भाबड (३२, रा. वेहळगाव, नांदगाव) हे देखील कामासाठी बसच्या खाली उतरले. काम झाल्यानंतर भाबड पुन्हा बसमध्ये बसले. त्यांनी बस सुरू करताच जोरदार आवाज झाला अन् अचानक बस पुढील बाजूने वेगाने सरकली. त्यात फलाटावरील लोखंडी बार तोडून बस थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर जाऊन धडकली. यादरम्यान चौकशी कक्षाजवळील ओट्यावरून पती मुपाल्ला नागर्जुन (३०, रा. कोंडीकंडूर, जि. प्रकाशम) यांच्यासोबत चालत असलेल्या अंजली नागर्जुन यांना बसची जोरदार धडक बसली तर मुपाल्ला हे थोडक्यात बचावले. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याचप्रमाणे चौकशी खिडकीबाहेर माहिती घेण्यासाठी उभे असलेले गोरक्ष मछिंद्र गोसावी (५७, रा. पाथर्डीफाटा) हे देखील बसच्या धडकेत गंभीर जखमी झाले. बसच्या धडकेत अंजली यांचा जागीच मृत्यू झाला तर गोरक्ष यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात चौकशी कक्षाची एका बाजूची भिंत पूर्ण कोसळली आहे. हा प्रकार पाहताच स्थानकातील कर्मचारी, अन्य बसचालक, वाहकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी महामार्ग बसस्थानकात धाव घेऊन चालक भाबड यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.