नाशिक : द्वारका चौकातील महापालिकेच्या मालकीच्या चार एकर जागेवरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. संबंधित जागेचा ताबा सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने कायम ठेवत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईला वेग दिला आहे. त्यानुसार नाशिक पूर्व विभागाने ६० दुकानदारांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजाविल्या आहेत.
द्वारका चौकातील सर्व्हे क्रमांक ४८९ मधील फायनल प्लॉट क्रमांक २८२ ही सुमारे चार एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे. नाशिक नगरपालिका अस्तित्वात असताना १९७३ पासून ही जागा भाडेतत्त्वावर दुकानदारांना दिली होती. सद्यःस्थितीत या जागेवर १०९ दुकानदार व्यवसाय करीत आहेत. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असल्यामुळे महापालिकेने २०१५ मध्ये संबंधित दुकानदारांना नोटिसा बजाविल्या होत्या. त्यानंतर दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तांनी संबंधित दुकाने अनधिकृत ठरवित १५ दिवसांमध्ये जागा रिकामी करण्याचे महानगरपालिका आदेश दिले होते.
या कारवाईविरोधात दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने दि. ५ जानेवारी २०२३ रोजी महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ४० दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेने अतिक्रमण हटविताना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने दुकानदारांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.
आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये दाखल या अपिलात महापालिकेची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. तुषार मेहता यांनी मांडली. सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करण्याचे निर्देश दिल्यामुळे महापालिकेने त्यानुसार नोटिसांची कार्यवाही सुरू केली आहे.
वाहतूक कोंडी, अपघातांचा दाखला
द्वारका सर्कल परिसरात मोठी लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि सातत्याने मोठी वाहतूक असते. या परिसरात बँका, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक संकुले आणि हॉटेल्स आहेत. नाशिक - पुणे मार्ग तसेच मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत असल्याचे नोटिसांमध्ये नमूद केले आहे.
तीन दिवस सुनावणी
दुकानदारांना थेट जागा रिकामी करण्याचे निर्देश देतानाच त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. दि. २१ ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित दुकानदारांचे म्हणणे ऐकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
वाहतूक कोंडी, अपघातांचा दाखला
द्वारका सर्कल परिसरात मोठी लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि सातत्याने मोठी वाहतूक असते. या परिसरात बँका, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक संकुले आणि हॉटेल्स आहेत. नाशिक - पुणे मार्ग तसेच मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत असल्याचे नोटिसांमध्ये नमूद केले आहे