flower farming 
नाशिक

Manmad Marigold Flower Farming | दसरा-दिवाळीपूर्वीच बळीराजा संकटात! पावसाच्या दडीमुळे मनमाड परिसरात झेंडूची शेती करपली

Manmad Marigold Flower Farming | दसरा, दिवाळीत उत्पन्नाची आशा मावळली; बळीराजा हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

मनमाड : रईस शेख

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला. गेल्या वर्षी अतिवृष्टीचे संकट आले होते. त्या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच यंदा पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आले. पाऊस गायब झाल्याचा फटका इतर पिकांसोबत झेंडूच्या फूलशेतीला बसल्यामुळे फुलांची लागवड करणारे हजारो शेतकरी हवालदिल झाले. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सण-उत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलांना जास्त मागणी असते. विशेषतः दसरा-दिवाळी तर झेंडूच्या फुलांशिवाय साजरीच होत नाही. झेंडू फुलांच्या लागवडीतून दोन पैसे जास्त मिळतात. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपारिक पिकांबरोबर झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

कमी खर्चात आणि कमी वेळेत हमखास उत्पन्न मिळत असल्यामुळे मका, कांद्यापाठोपाठ नगदी पीक म्हणून झेंडूच्या फुलांची ओळख निर्माण झाल्यामुळे मनमाड परिसरातील वंजारवाडी, सटाणे, हिसावळ, भालूर, बेजगाव यासह इतर भागांतील हजारो शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची लागवड करू लागले. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता.

अतिवृष्टीचा फटका इतर पिकांसोबत झेंडूच्या फूलशेतीला देखील मोठ्या प्रमाणात बसला होता. यंदा सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मका, बाजरी, कांदा, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद यांसह इतर पिकांसोबत झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे.

फुलांचे पीकही जोरदार आल्याचे पाहून यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होईल असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली. ज्या काळात झाडांना फुले लागून त्यांची वाढ होत असते त्याच काळात पाऊस गायब झाल्यामुळे झाडांसोबत फुलांची वाढ खुंटली आहे. शिवाय पावसाअभावी फुले काळे पडून करपू लागल्यामुळे खर्च वाया गेला आहे.

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यावर शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, झेंडू फूलशेतीचे नुकसान झाल्यानंतर त्याचे पंचनामे केले जात नसल्याने नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे लागवडीवर केलेला खर्च वाया जात असल्यामुळे शासनाने इतर पिकांप्रमाणे झेंडू फूलशेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

"दसरा-दिवाळी सणासाठी मी १० वर्षांपासून झेंडूच्या फुलांची लागवड करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा इतर पिकांसोबत एक एकरात फुलांची लागवड केली होती. झेंडूच्या फुलांची लागवड करण्यासाठी एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. फुलाच्या शेतीतून दोन पैसे हातात पडतील आणि दसरा, दिवाळी चांगली साजरी होईल, अशी आशा होती. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे इतर पिकांसोबत झेंडूचे फुलही हातातून गेल्यामुळे सण साजरा करणार तरी कसा आणि जगावे तरी कसे, असा प्रश्न पडला आहे."
- सुनील पवार, शेतकरी, सटाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT