येथील 'सावना'ने वाचनासाठी प्रोत्साहन दिले. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या आमदनीत नाशिकने समृद्ध करणारे अनुभव दिले. कुुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापनेपासून माझा सहभाग होता. प्रतिष्ठानच्या पुरस्कार निवड समितीवरही काम केले आहे. पहिली नोकरी नाशिकमध्येच मिळाली. कविश्रेष्ठ तात्यासाहेब शिरवाडकरांनी नेहमीच मायेची शाल पांघरली. अध्यक्षपदी झालेली निवड त्यांच्यासह ज्येष्ठ-श्रेष्ठांचा आशीर्वादच असल्याची भावना अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.
दिल्ली येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. भवाळकर यांनी 'पुढारी'शी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्या कामाची, लेखनाची दखल घेतली याचा आनंद आहे. निवड अकल्पित होती. मराठीला मिळालेल्या अभिजात दर्जाच्या पार्श्वभूमीवर ही निवड योगायोग म्हणावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. तसेच संमेलनाध्यक्ष म्हणून शेवटपर्यंत जे शक्य होईल ते सर्व काही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
नाशिकचे रावसाहेब नारायण गोविंद पिंगळे हे माझे आजोबा. मला घडवण्यात आजोबांचा, नाशिककरांचा मोठा वाटा आहे. आजोळच नव्हे तर माझे बंधुराज नाशिकलाच आहेत. नाशिककरांबद्दल विलक्षण प्रेम आणि त्यांच्याप्रति कृतज्ञ भाव डॉ. भवाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
स्वातंत्रोत्तर काळात अन्य भाषेकडे मराठी भाषिकांचा ओढा वाढला आहे. मराठी अध्यापन, अध्यायनाकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिला हे शासकीय पातळीवर ठीक आहे. परंतु हा दर्जा वाढवा, टिकून राहावा. यासाठी प्राथमिक स्तरावर शिक्षण, मराठी शाळांच्या शिक्षकांना वेतन, शाळा इमारतींचे अद्ययावतीकरण महत्त्वाचे आहे. भाषा जेव्हा सामान्य माणसाच्या चलनात असते तेव्हाच ती टिकते. मराठीलाही अशा उन्नतीचे वैभव लाभावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.