डॉ. तारा भवाळकर pudhari news network
नाशिक

Dr Tara Bhawalkar | डॉ. भवाळकर यांचा गोदानगरीशी स्नेह अनुबंध; आजोळ नाशिकचे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याने त्यांचे आजोळ असलेल्या नाशिकमधील साहित्यवर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (A joyous celebration was held in the literary circles of Nashik, where Dr. Tara Bhawalkar lived)

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डाॅ. तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत.

लोकसाहित्याच्या अभ्यासिका आणि लोकसाहित्याची स्त्रीवादी दृष्टीने मांडणी करून लेखन करणाऱ्या पहिल्या लेखिका म्हणून डाॅ. भवाळकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे नाशिकशी असलेले ऋणानुबंध लक्षात घेता, २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी त्यांचीच निवड होईल, अशी चर्चा होती. मात्र, तसे घडू शकले नाही आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव नारळीकर यांची निवड झाली. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. भवाळकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने नाशिक साहित्य वर्तुळात समाधान असून त्यांची निवड योग्यच असल्याची भावना साहित्यिक, लेखकांनी व्यक्त केली.

नाशिकशी घनिष्ठ संबंध असलेल्या डॉ. भवाळकर यांच्या निवडीने नाशिककरांना आपल्या घरातील कुणीतरी सन्मानित झाल्याची भावना आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे, लोभस आणि तितकेच अभ्यासू असल्याने त्याची झालेली निवड योग्य आहे.
नरेश महाजन, साहित्यिक, नाशिक.
डॉ. भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासिका आहेत. यांच्या निवडीचा आनंद आहे. दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हीदेखील पार्श्वभूमी आहे. मराठीला मिळालेल्या 'अभिजात दर्जा' या पार्श्वभूमीवर त्यांची निवड आनंददायी आहे.
विवेक उगलमुगले, साहित्यिक, नाशिक.
डॉ. भवाळकर या संशोधनपर लेखन करणाऱ्या साहित्यक म्हणून ओळखल्या जातात. हल्ली संशाेधनपर लेखन करणारे साहित्यिक कमी झालेले आहेत. भवाळकर यांची निवड झाल्याचा विलक्षण आनंद आहे. शिवाय त्यांचे नाशिकसमवेतही अनुबंध असल्याने नाशिककर म्हणूनही अभिमान, आनंद आहे.
अनंत येवलेकर, साहित्यिक, नाशिक.
साहित्यिक कामगिरीचा वेळेतच सन्मान व्हायला हवा. परंतु डॉ. भवाळकर यांना त्यांच्या कामगिरी, योगदानाकडे बघता हे अध्यक्षपद काहीसे उशिराच मिळाले. त्यांचे लिखाण, विचार थोर आहेत. हा त्याचा उचित सन्मान आहे. उशिरा का होईना त्यांना अध्यक्षपद मिळाले हे आनंददायी आहे.
विजयकुमार मिठे, ग्रामीण साहित्यिक, नाशिक.
डॉ. भवाळकर यांची झालेली निवड सार्थ आहे. मराठीला अभिजातचा दर्जा प्राप्त झाला. त्यात त्यांनी मराठी भाषेसाठी जे कार्य केलेले आहे, ते म्हणजे मराठी विश्व आणि वाङ्मय कोश, ग्रंथकोशाच्या कार्यातले त्यांचे योगदान अमूल्य आहे. अरुणा ढेरे यांच्यानंतर पाच वर्षांनी महिला साहित्यिकेची अध्यक्षपदी निवड झाल्याचा अभिमान आहे.
अलका कुलकर्णी, लेखिका, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT