नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत रविवार (दि. 18) पासून नाशिकमध्ये येत आहेत. येथे सुरु असलेल्या संघ शिक्षा वर्गात ते मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचा 'कार्यकर्ता विकास वर्ग– प्रथम' (सामान्य) १८ ते ४० वर्ष या वयोगटातील तरुण स्वयंसेवकांचा प्रशिक्षण वर्ग ११ मे पासून सुरू झाला आहे. या वर्गात शिक्षार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी सरसंघचालक भागवत यांचे १८ मे रोजी दुपारी ३.३० वाजता शिर्डी येथील विमानतळावर आगमन होणार आहे.
शिर्डी येथील साई मंदिरात साईबाबांचे दर्शन घेऊन ते नाशिकला रवाना होणार आहे. सायंकाळी ६ वाजता त्यांचे नाशिक येथे आगमन होईल. येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या परिसरात या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २१ मे पर्यंत सरसंघचालक या वर्गस्थानी मुक्कामी असणार आहेत. २१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ते पुढील प्रवासास मार्गस्थ होतील. दरम्यान त्यांचे कोणतेही जाहीर कार्यक्रम असणार नाहीत. येत्या १ जून पर्यंत चालणाऱ्या या वर्गात महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यातून म्हणजे संघ रचनेतील विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि सौराष्ट्र अशा सहा प्रांतातील २८० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या वर्गात सहसरकार्यवाह कृष्णगोपाल, अ. भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.